उष्ण हवामानातही चांगले उत्पादन देणाऱ्या नवीन जातींमुळे या पिकांच्या लागवडीचा हंगाम फक्त हिवाळ्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रात ही पिके जवळपास वर्षभर घेता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोबीसारखी भाजी टिकायला आणि वाहतुकीला चांगली असते. आहाराच्या दृष्टीने या भाज्या उत्कृष्ट आहेत. शिवाय आंतरपीक म्हणूनही घेतल्या जातात. कोबी पिकात येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण या विषयी माहिती पाहूया.
रोग आणि उपयोजना
१) रोपे कोलमडणे
या रोगामुळे रोपे जमिनीलगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग बुरशीमुळे होतो.
उपाय:
- हा रोग आटोक्यात आणण्यासाठी वाफ्यात कॅप्टन बुरशीनाशकाचे ०.१ टक्के द्रावण झारीने शिंपडावे.
- पेरणीपूर्वी बियांना थायरम किंवा कॅप्टन २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
२) घाण्या रोग (ब्लॅक रॉट)
या रोगामुळे पाने पिवळी पडतात आणि पानांच्या शिरा काळ्या होतात. खोडाचा आतील भाग काळपट पडतो. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बी आणि जमीनीद्वारे होतो.
उपाय:
- रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बी ५०० सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ३० मिनिटे बुडून घ्यावे व सुकवावे.
- त्यानंतर ते रोपवाटिकेत पेरावे.
- रोगप्रतिकार जाती लावाव्यात.
- रोगाची लक्षणे दिसताच झाडाच्या खालील पाने काढून नष्ट करावी.
- कॉपर ऑक्झीक्लोराइड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
३) पानावरील ठिपके आणि करपा
हे रोगही कोबीवर्गीय पिकावर येतात.
उपाय:
- यांच्या नियंत्रणासाठी शक्यतो पिकाची फेरपालट करावी. एकच पीक त्याच त्याच जमिनीत घेऊ नये.
- पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी (कोमट पाण्यात बी बूडवून काढून लावणे किंवा बियांना शिफारस केलेले रसायन चोळणे) थायरम २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
- रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मँकोझेब किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल ३८.३९% एस.सी. १० मिली अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लि. पाण्यातून फवारावे.
अधिक वाचा: Falmashi : वेलवर्गीय भाजीपाला पिकातील फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी सोपे उपाय