आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यापूर्वी सर्वत्रच वसुलीची धूम सुरू आहे. व्यावसायिक वापरातील प्रॉपर्टी किंवा राहते घर असले तरीही त्याची विजेची काही थकीत रक्कम असेल तर ती न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाते.
थकीत वीजबिलासाठी वीज जोड अथवा वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी सूचना देणे बंधनकारक आहे.
काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्राहकांकडून ५-६ दिवसांचा बिल भरणा करण्यास उशीर झाल्याने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वीजजोडणी अथवा कनेक्शन तोडले जाते.
कनेक्शन तोडण्यापूर्वी नोटीस अथवा पूर्वसूचना न देता बिल भरण्याचा आलेला एसएमएस म्हणजे नोटीस असू शकत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्युत अधिनियम २००३ कायदा तरतुदर्दीतील कलम ५६ नुसार थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कलम देशभरातील विद्युत पुरवठा कंपन्यांना लागू करण्यात आले आहे.
खासगी असो वा शासकीय, प्रत्येक वीजपुरवठादारास थकीत बिलाअभावी वीजजोडणी अथवा कनेक्शन तोडण्यापूर्वी लेखी पूर्वसूचना अथवा नोटीस बंधनकारक करण्यात आली असून, तो ग्राहकांचा महत्त्वाचा अधिकार आहे.
काही कारणाने वीजबिल भरण्यास नाममात्र उशीर झाल्यास वीजजोडणी अथवा कनेक्शन तोडणे बेकायदेशीर आहे. काही वेळा आर्थिक वर्षातील टार्गेट पूर्ण करण्याच्या निमित्ताने अशा कारवाया केल्या जातात.
मात्र अशा एकतर्फी कारवाईच्या विरोधात संबंधित तक्रारदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी किंवा ग्राहक न्यायलयात दाद मागू शकतात.
- प्रगती जाधव-पाटीलउपसंपादक, लोकमत
अधिक वाचा: कोकणातील मसाल्याची राणी बहरली अकोलेच्या शेतात; दोन वेलीला निघाली तब्बल १० किलो मिरी