Join us

शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 15, 2023 3:51 PM

भारताच्या चंद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत.

अवघ्या जगाचे लक्ष लागलेलं भारताचा चंद्रयान -३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लँड होणार आहे. भारताच्या चंद्रयान तीनच्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का? याकडे अनेकांचे लक्ष आहे. भारताची चंद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर चर्चा होतेय अंतराळातील शेतीची. चंद्रावरील मातीतील पोषक तत्वांसह अंतराळातही शेती केली जाऊ शकते. संशोधकांनी चंद्रावर कोणत्या पद्धतीने शेती करता येऊ शकते याचादेखील अभ्यास केला आहे. आणि त्यात असे समोर आले की चंद्राच्या मातीत वनस्पती वाढू शकतात.

कशी करतात अंतराळात शेती? कोणत्या देशांनी अंतराळात शेतीला सुरुवात केली आहे? अशी कोणती पिके आहेत जी अंतराळात उगवू शकतात? पाहूया...अंतराळात शेती कशी करतात?

पृथ्वीवर होणारी शेती आणि अंतराळातील शेती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण, अंतराळातही शेतीचा प्रयोग केला जात आहे. विशेषत: चंद्राच्या मातीत वनस्पती उगवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. नासा या वनस्पतींसाठी अंतराळात हरितगृहे विकसित करत आहे. ही हरितगृहे पाणी आणि सुर्यप्रकाश यांना वनस्पती वाढीसाठी वापरेल आणि चंद्राच्या कठोर आवरणापासून संरक्षण देईल. अंतराळात पाठवलेले बीज सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहते आणि तेथे त्यांना कॉस्मिक किरणांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. ही प्रक्रिया त्या पीकाच्या विकासाची असते.

कोणत्या देशांनी केली अंतराळात शेती?

अंतराळात शेतीच्या होणाऱ्या प्रयोगांमध्ये अनेक देश पुढे येत आहेत. चीन, अमेरिकेसारखे देशही अंतराळात शेतीचे प्रयोग करण्यात अग्रगण्य आहेत. अमेरिकेच्या नासा या संस्थेने तर अंतराळातील शेतीचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर शेअर केला होता. चीन अंतराळात गव्हाच्या प्रजातींचे उत्पादन करण्याच्या तयारीत आहे. तर अमेरिकने मुळयाचे पीक केवळ २७ दिवसात घेऊन दाखवले. अंतराळात पिकलेल्या मुळ्याचा रंग हा सर्वसाधारण मुळ्यापेक्षा वेगळा होता. चीनचे शास्त्रज्ञ अंतराळात भात, मका, सोयाबीन, तीळ, कापूस अशा पीकांची लागवड करणार आहे.

चंद्रमोहिमा शेतीसाठी फायद्याच्या

लोकसंख्या वाढीमुळे आणि वाढत्या शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जगभरातील शेतीक्षेत्र हे झपाट्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अंतराळात शेती करण्याकडे जगातील बलाढ्य राष्ट्रांचे पाऊल वळताना दिसत आहे. आता भारताच्या यशस्वी चंद्रयान-३ उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत.

अंतराळात अन्न पिकवण्याचे नवे मार्ग विकसित करण्यात तसेच चंद्राच्या वातावरणाचा अंदाज बांधण्यासाठी चंद्रयान मोहिमांचा फायदा येणाऱ्या काळात होऊ शकतो. भविष्यातील अंतराळातील कृषी संशोधनासाठी हे महत्त्वाचे आहे. अंतराळात नवे कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, चंद्रावर पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात पिके कशी उगवायची याच्या अभ्यासासाठी चंद्रमोहीमा भारताला दिशादर्शक  ठरू शकतात. 

 

टॅग्स :चंद्रयान-3काढणीलागवड, मशागतशेतीपीकनासाचीनअमेरिकाशेती क्षेत्र