आपली बाग ही आपण लेकरांसारखी वाढवत असतो. कारण लहान बाळं ही जेवढा आपल्याला निर्व्याज आनंद देतात तेवढाच आनंद आपल्या बागेतील झाडे, पाने, फुले, फळे देत असतात.
रोजचा नेम म्हणून आपण झाडांना पाणी देतो. पण हे अतिपाणी हेच झाडांसाठी घातक ठरते. जसे अति लाडामुळे मुलं बिघडतात. तशीच अति पाण्यामुळे झाडांचे आरोग्य बिघडते. झाडांच्या या पाण्याच्या मानसशास्त्राला समजून घेणे फार गरजेचे आहे. कारण पाणी हे माध्यम असे आहे की ते झाडांवर परिणाम तर करतेच पण मातीचे आरोग्य ही घडवण्यात मदत करत असते.
कुंडीतील झाडांना मिलीबग येणे, पाने कर्ली होणे (मुरडा, बोकड्या रोग) येणे, अकाली झाडं कोमेजून जाणे, हे अतिपाण्यामुळेच होतात. तर कधी कधी अति पाण्यामुळे झाडांना योग्य मोसमात फुले, फळे न लागणे हे सुध्दा घडते.
पाण्यात नत्राचे प्रमाण अधिक असते. पाण्याव्दारे नत्र हे अधिक झाडांच्या पानांमधे साचलं की त्यांच्या अन्न वाहून नेणाऱ्या नसात नत्र साठते. (Saturate) होते. तेथे पुढील प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्या गाठी, अडथळा काढून टाकण्यासाठी मिलीबग, पिठ्या ढेकून येतात. जर यांची वाणवा असल्यास तेथे पाने मुरडतात. पाने आकसली गेली की त्यांची अन्न प्रक्रिया होत नाही. मग पुढे झाड आजारांना बळी पडते.
पाण्याचा ताण आवश्यक
पाण्याचा योग्य ताण दिल्यास झाडांमधे असुरक्षतेची भावना तयार होते. अशा वेळेस ते साहजिकच त्यांचा वंश वाढण्यासाठी फळांची उत्पत्ती करतात. त्यामुळे झाडांना आठवड्यातून एकदा पाणी देवू नये. जसे आपण आपली पचनसंस्था स्वच्छ व जोमाने कार्यरत व्हावी यासाठी उपवास करतो. त्याप्रमाणे झाडांना अर्थात बागेला पाण्याचा उपवास घडवावा.
अधिक पाण्यामुळे कुंडीतील माती नेहमी ओली राहते. त्यामुळे तेथे विषाणूंची वाढ होते. खरंतर वर्षातून एकदा माती संपूर्णतः वाळवून घेणे फार गरजेचे असते. म्हणून तर आपले पूर्वज हे उन्हाळयात शेती नांगरून ठेवत असे. तसेच वर्षा दोन वर्षातून एकदा कुंडी रिपॉटींग करणे अर्थात माती बदलवणे (म्हणजे नवीन नाही पण अदला-बदल करणे) गरजचे असते.
पाण्याच्या अति वापरामुळे कुंडीत अथवा मातीतील अन्न घटकांचे विषमतेने विभाजन होते. त्यातून निर्माण होणारे वायू अर्थात वाफसा पध्दतीतील गंध हा विपरीतपणे अन्न पुरवठा करत असतो. जसे की आपल्याला करपट ढेकर येणे, हे अन्न व पाण्याचे विषम प्रमाण झाले की होते. त्या प्रमाणे झाडांनाही होते. आपण जड आहार घेतला ( पुरणपोळी, रव्याचे लाडू, मासांहार) व त्यावर पुरेसे पाणी न प्यायले, तर अपचन होणे तसेच त्याच्या विरोधात की आपण सुपच प्यायले, भरपूर पाणी प्यायले तर भूक लागणे पुढे कमजोरी जाणवणे असा प्रकार झाडांच्या बाबतीत होत असतो.
झाडंही थकतात, मरळगतात
झाडांना रोज पाणी देत असल्यास त्यात खंड पाडा. बरेचदा मंडळी सायंकाळ झाली की झाडे (मरगळलेली असतात) मेली की काय घाबरून जातात. आजारी आहेत असे सागंतात. एक सांगा, आपण रोज दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका. त्यांना सारखं सारखं पाणी देवू नका. वातावरणातील उष्मा कमी झाला की ते पुन्हा टवटवीत होतात.
कुंड्या योग्य प्रकारे भरा
बरेचदा मंडळी कुंडी भरताना माती व खत टाकतात. खताचे अवशेष वापरून झाले की उरते फक्त माती. ही माती कालातंराने दगडासारखी टणक, जड होते. त्यात एकतर पाणी साचून राहते. मुळांना श्वास घ्यायला जागा उरत नाही. अशा वेळेस कुंडी भरताना पालापाचोळा, किंवा बिशकॉमचा वापर करावा.
कुंडीत जेवढी हवा खेळती राहिल तेवढे कुंडीतील झाडं अधिक टवटवीत राहते. कारण मुळंसुध्दा श्वास घेतात. बरेचदा मुळं हे हवेतून पाणी ग्रहण करत असतात. म्हणूनच इस्त्राईल सारखा देश थेंब न थेंब पाण्याचे नियोजन करून जगाला पोसण्याची धमक दाखवतो त्याचे कारण म्हणजे त्यांनी पाण्याचे ओळखलेले महत्व. व आपल्याकडे शेतीसाठी पाण्यााच अधिकचा होणारा वापर हा जमीनी खारपट, नापिकी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. अर्थात त्यात रासायनिक खतांचाही वाटा आहेच.
पाण्याच्या अधिक ताणामुळे किंवा अधिकच्या पुरवठ्यामुळे फळगळती होत असते. त्यामुळे योग्य पाणी कसे द्यावे याचा संभ्रम निर्माण होईल. आता हे अनेक कारणांवर अवलंबून आहे. मातीचा पोत कसा आहे, पाण्याचे बाष्पीभवन कसे होते. वाहणारा वारा किती व वेग कसा आहे. झाडाची प्रकृती नेमकी कोणती आहे या सार्यांचा विचार करूनच पाणी देणं गरजेचे आहे. आईला सांगावे लागते का बाळाला कधी, केव्हां, किती पाणी द्यावे. हे तिला हृदयापासून समजते. त्याचे कुठेही पुस्तक नाही, गाईडलाईन नाही. कारण ती मनापासून बाळाशी जुळलेली असते. तशीच आपली नाळ सुध्दा बागेशी जुळली पाहिजे. म्हणून तर बाळ व बाग ही या शब्दांची सुरवात एकाच अक्षराने तर होतेच शिवाय त्यांची संख्या सुध्दा सारखीच आहेत.
तसेच बागेत झाडांवर मिलीबग, पिठ्या ढेकूण, मावा या सारखे आजार आल्यास त्यावर नैसर्गिक औषधांची नक्कीच फवारणी करा. पण फक्त फवारणी करून चालत नाही. त्यासाठी झाडांला नेमकं पाणी कमी पडलं की जास्त झालयं याचा विचार करा. जास्त झालं असेल तर कमी द्या. जसे रोग्याला आजारावर औषधपण देतात व पथ्थ पण पाळायला सांगतात. त्यामुळे पाण्याचे पथ्थ पाळा.
- संदीप चव्हाण, नाशिक
संपर्क :+91 80874 75242
(लेखक शहरी शेती, गच्चीवरची शेती यातील तज्ज्ञ आहेत.)