कोकणात प्रामुख्याने चवळी, उडीद, मूग, कुळीथ, मटकी, तूर ही कडधान्ये मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात. चवळी पिकासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी (Kokan Krishi Vidyapith) विद्यापीठाने 'कोकण सदाबहार' व 'कोकण सफेद' या दोन सुधारित जातींची शिफारस केली आहे. ६० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या या जातीपासून हेक्टरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. सध्या चवळी लागवडीची कामे जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहेत.
चवळी पिकासाठी मध्यम ते भारी जमीन उपयुक्त आहे. जमिनीची उभी व आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी व फळीने समपातळीत आणावी, रब्बी हंगामात मात्र उतारास आडव्या दिशेने योग्य (४ मीटर बाय ३ मीटर) आकाराचे सपाट वाफे तयार करून दोन वाफ्यांमध्ये पाण्याचे पाट ठेवावेत.
खरीप पिकासाठी उताराची व निचऱ्याची जमीन निवडावी. खरीप हंगामातील पीक १५ जुलैनंतर पेरावे तर रब्बी हंगामातील पिकाची पेरणी दि. १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबरअखेर करावी. दक्षिण कोकण विभागातील जमिनीमध्ये चवळी या पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पिकाची पेरणी दि. १० डिसेंबर ते ३० डिसेंबर (५० ते ५२च्या हवामान आठवडा) पर्यंत करावी.
चवळी पिकाची पेरणी ३० सेंटिमीटर बाय १५ सेंटिमीटर अंतरावर करावी. व हेक्टरी १५ ते १८ किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी १ किलो चवळी बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर प्रतिकिलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅमप्रमाणे रायझोबियम व स्फूरद विरघळवणाऱ्या जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया करून त्वरित पेरणी करावी. या पिकाला पेरणीच्या वेळी प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र, ६० किलो स्फूरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
चवळी पिकाला आठ ते नऊ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तण नियंत्रणासाठी तण उगवणीपूर्व पेन्डीमिथेलीन ३० इ. सी १०० (१.५ किलो ग्रॅम हेक्टरी किंवा ऑक्सिडायरजिल ८० टक्के डब्ल्यू, पी. (१२५ ग्रॅम/हेक्टरी) तणनाशक वापरावे.
३० दिवसांनी पीक निंदणी करून तण मुक्त ठेवावे. ६० ते ८० दिवसात चवळीचे पीक तयार होते. शेंगा काढून त्या वाळवून दाणे काढून पुन्हा वाळवून ठेवल्या जातात. शेंगा लागण्यापूर्वी चवळीची पान खुटून पालेभाज्या म्हणून विक्री केली जाते. बाजारात चवळीच्या भाजीला वाढती मागणी आहे.
चवळीची उपयुक्तता
चवळीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी. लोह, कॅल्शिअम, प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. आयुर्वेदात अनेक रोगांसाठी चवळी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी चवळी फायदेशीर आहे. पोटासंबंधी आजारासाठीही फायदेशीर आहे. चवळी सेवन केल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते. खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.