Join us

Citrus Fruit Management : लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात असे करा संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:02 IST

लिंबूवर्गीय फळ बागांचे हिवाळ्यात कसे संरक्षण करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी दिलेला कृषी सल्ला वाचा सविस्तर (Citrus Fruit Management)

Citrus Fruit Management :  लिंबूवर्गीय फळझाडे सदाहरित असतात. त्यामुळे या पिकांमध्ये पानगळ होत नाही. मात्र, अधिक थंडीच्या काळात ती सुप्त अवस्थेत जातात. सद्यस्थितीत थंडीची वाढ होण्यासाठी आवश्यक ते घटक अनुकूल आहेत.

वाढलेला गारठा आणि ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणाम झाडावर होताना दिसतो आहे. वातावरण सहन करण्याची प्रत्येक वनस्पतीची मर्यादा ही वेगवेगळी असते. जमिनीचे तापमान हे झाडांच्या संपूर्ण वाढीच्या काळात अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

कारण विशिष्ट तापमानांतच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये झाडांच्या मुळाद्वारे शोषले जातात तसेच जमिनीतील उपयोगी सुक्ष्मजीवांचे कार्य अविरतपणे सुरू राहून जमिनीतीलपरिस्थिती वातावरणाशी समरस होऊन झाडाच्या जडणघडणीत अवरोध निर्माण होत नाही.

त्यामुळे जमिनीतील तापमान उचित असणे गरजेचे आहे. यामध्ये मोठा फरक झाल्यास झाडाच्या चयापचनामध्ये बदल होऊन झाडाच्या अस्वस्थेचे वातावरण निर्माण होते.तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास लिंबूवर्गीय वनस्पतीमध्ये चयापचनमध्ये बदल होतो. परिणामी सर्वक्रिया थांबतात.

कमी तापमानात झाडांची वाढ मंदावणे, वनस्पतींच्या पेशी गोठल्याने त्यांचा क्षय होणे, फळे तडकणे,  पानगळ, फळगळ होणे व फांद्याची साल फाटणे अश्या समस्या दिसून येतात.त्यामुळे हवामानातील घटकांचा विचार करून फळबागेचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी फळबागांची कशी काळजी घ्यायची त्याची सविस्तर माहिती पाहुयात.

बागेचे नियोजन करताना ही काळजी घ्या

* मृगबहारातील संत्रा, मोसंबी जानेवारीमध्ये तोडण्यास येणाऱ्या लिंबू बहारातील बागेस विहिरीचे ठिबक सिंचनाने किंवा वाटाणे पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेचे उष्ण तापमान थोडे वाढते आणि झाडांच्या वाढीवर थंडीचा विपरीत परिणाम होत नाही. शक्यतो संध्याकाळी अथवा पहाटेच्या वेळी पाणी द्यावे यामुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण योग्य राहू थंडी कमी राहण्यास मदत होते.

* फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर सायंकाळी तसेच पहाटेच्या वेळी सुक्या कचऱ्यावर मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. धुरामुळे बागेतील वातावरण उष्णता निर्माण होण्यास मदत होईल.

* झाडांच्या खोडापाशी व आळ्यात गवत, कडबा पाचोळा यांचे मल्चिंग करावे किंवा पॉलीथिन (१०० मायक्रोन) आच्छादन करावे.

* रोपटिकेतील रोपांचे वाफे, रोपे, कलमा यावर रात्री अच्छादन घालावे व सकाळी ते काढावे.

* खोडाची साल फाटल्यास अथवा तडे गेल्यास सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डोपेस्ट लावावे यामुळे जखमेतून बुरशीचा होणारा शिरकाव थांबवता येतो.

* संत्रा मोसंबी किंवा लिंबू बहारातील झाडावर ०.२% चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण ( २० ग्रॅम/ १० लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* पलाश युक्त वरखत (म्युरिट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश) किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची जल व अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून झाडांच्या पेशींचा काटकपणा वाढतो. त्यामुळे झाडांना तडे जाण्याचे प्रमाण कमी होते.

* मृगबहारातील संत्रा किंवा मोसंबी तसेच हस्त बहारातील लिंबू फळांचा आकार वाढविण्यासाठी एन.ए.ए. १० पीपीएम (१ ग्रॅम किंवा जिब्रेलिक आम्ल १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) + १% मोनो पोटॅशियम फॉस्फेट (०:५२:३४) १ किलो + १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* जानेवारी महिन्यात लिंबूवर खैऱ्या रोगाचा उपद्रव संभवतो. नियोजनाकरिता कॉपर ऑस्किक्लोराईड ०.३ % (३० ग्रॅम) +स्ट्रेप्टोसायक्लीन १०० पीपीएम (१ ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* थंडीच्या काळात संत्र्यावरील कोळी मुख्यतः विकसित होणाऱ्या फळावर अधिक प्रादुर्भाव करतात. सतत रस शोषण करत असल्याने फळावर विशिष्ट डाग पडतात. त्यामुळे फळाची प्रतवारी बिघडते. लाल कोळीच्या व्यवस्थापनासाठी आबामेक्टिन १.९ ईसी* ३.७ मिली किंवा प्रोपरागाइट ५७ ईसी* २० मिली किंवा डायफेन्थूरोन ५० डब्लूपी* 20 ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून २० दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.

* दाट फांद्या यांची छाटणी केल्याने हवेचे परिसंचरण आणि प्रकाश प्रवेश झाडांमध्ये चांगला होतो. त्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळते.

* त्याचबरोबर संत्रा फळाची प्रत चांगली ठेवण्याकरिता ५ टक्के निंबोळी अर्काची एका महिन्याच्या अंतराने दोन वेळा फवारण्या कराव्यात.

(सौजन्य : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

टॅग्स :शेती क्षेत्रफळेपीक व्यवस्थापनशेतकरीशेती