Join us

Citrus Fruit : लिंबूवर्गीय फळांची आंबट गोड गोष्ट...... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 17:51 IST

Citrus Fruit दक्षिण कोरियातील जेजू या बेटावर आंतरराष्ट्रीय सायट्रस परिषद नुकतीच पार पडली. यात मोसंबी, लिंबू, संत्री, ग्रेपफ्रूट, पुमेलो या लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीपासून तर तोडणीपर्यंत चर्चा करण्यात आली.

दक्षिण कोरियातील जेजू या बेटावर आंतरराष्ट्रीयinternational सायट्रसCitrus परिषद नुकतीच पार पडली. महाराष्ट्राप्रमाणे जेजू बेटावरही मँडरीन (संत्रा) हे प्रमुख पीक आहे. या परिषदेत जगभरातील ५०० प्रतिनिधींनी मोसंबी, लिंबू, संत्री, ग्रेपफ्रूट, पुमेलो या लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीपासून तर तोडणीपर्यंतच्या व्यवस्थापन, प्रक्रिया व निर्यातीवर सांगोपांग चर्चा केली.

महाराष्ट्रात विकसित केलेल्या मोसंबीच्या हॅमलिन, वेस्टिन, नाताल, पेरा आणि व्हॅलेन्सिया या प्रजातींची वैशिष्ट्ये, सिंचन पद्धती व फर्टिगेशन सादर करण्यात आले.

जेजू या अंडाकृती बेटाचे क्षेत्रफळ १८३३ चौरस किमी असून, ६७८.३२४ लोकसंख्या आहे. या बेटाचे हवामान उप-उष्णकटिबंधीय असल्याने हे हवामान लिंबूवर्गीय फळ लागवडीसाठी आदर्श व सर्वोत्तम आहे.

पर्यटनासोबत लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन व विक्री हे या बेटाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. अकराव्या शतकापासून सन १९११ पर्यंत लिंबूवर्गीय फळांच्या स्थानिक वाणांची लागवड केली जात होती.

सन १९११ मध्ये सात्सुमा मंडारीन (संत्रा) जपानमधून जेजू येथे आणले गेले. येथील लिंबूवर्गीय बागांचे आधुनिकीकरण १९६० पासून सुरु केले. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्लॅस्टिक फिल्म हाऊस (हरितगृह) अंतर्गत संरक्षित उत्पादन प्रणाली, तसेच विरघळणाऱ्या घन पदार्थांसह फळांचा पुरवठ्यासाठी टायवेक प्लॅस्टिक शिट्ससह माती आच्छादन करून उत्पादन प्रणाली सन १९९० च्या दशकाच्या मध्यात सुरू केली. सन २००० व्या दशकाच्या सुरुवातीपासून फळांचा पुरवठा आणि उत्पादकांचे उत्पन्न व्यवस्थापित करण्यासाठी पॉलिसी साहाय्य अंतर्गत लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादन रक्कम कमी झाली आहे.

अलीकडे, हवामानातील बदल, मजुरांची टंचाई आणि कृषी साहित्याच्या वाढत्या किमती, बाजारपेठेतील स्पर्धा तसेच लिंबूवर्गीय नवीन जातींचा विकास आणि प्रगत कामगार-बचत तंत्रांचा विकास हे लिंबूवर्गीय उद्योग टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. या उद्दिष्टांसाठी प्रगत ओमिक्स तंत्रे, जीनोमिक्स आणि कृषी डिजिटलायझेशन तंत्रे, कृत्रिम बुद्धिमता यासह मूलभूत तंत्रांचे एकीकरण आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळ लागवडीसाठी महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळांच्या विकासासाठी उच्च घनतेची लागवड, बियाविरहित वाणांचा विकास, फळबागाची जमीन झाकण्यासाठी मल्चिंग प्लास्टिक शिटचा वापर, प्रदूषण कमी करणे, पर्यावरण आणि नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल राखणे, सर्वत्र हिरवळ राखणे व वृक्ष लागवड करणे, जेणेकरून उन्हाळ्यात, तसेच हिवाळ्यात तापमान कमी राहते आणि त्यामुळे संत्रा फळांवर चांगला केशरी रंग वाढतो, सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि रासायनिक खतांचा समतोल राखणे, शेतकऱ्यांना रोगमुक्त आणि उत्तम दर्जाच्या कलम केलेल्या रोपांचा पुरवठा हे महत्त्वाचे मुद्दे ठरले आहे.

रूटस्टॉक वापर

हल्लासन पर्वत व या बेटावरील जमीन ज्वालामुखीच्या लावापासून विकसित झाली असल्याने माती आम्लयुक्त आहे. येथील हवामान उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात खूपच थंड असते. टायफोलिएट ऑरेंज (पोन्सिरु स्ट्रीफोलियाटा) आणि त्याचे संकर (ट्रॉयर आणि कॅरिझो) रूट स्टॉक चांगले कार्य करतात. पॉन्सिरु स्ट्रीफोलियाटा मॉन्स्ट्रासा स्विंगल या रुट स्टॉकचा वापर मिनिह्यांग (सायट्रस किनोकुनी X पोंकन) या संकरित संत्रासाठी केला आहे. किनोकुनी एक लहान सीडलेस मंडारीन संत्रा आहे. याला सामान्यतः किशु संत्रा म्हणतात.

जागतिक लिंबूवर्गीय उद्योगाची आव्हाने

या परिषदेत लिंबूवर्गीय उद्योगासमोरील जगभरातील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. यात हवामान बदलाचा जागतिक आणि जेजू येथील लिंबूवर्गीय उद्योगावर होणारे परिणाम, एचएलबी किंवा लिंबूवर्गीय ग्रीनिंग रोग, लागवडीचे चांगले साहित्य आणि बिया नसलेल्या चांगल्या वाणांची अनुपलब्धता, डेटा उपलब्ध नसणे याचा समावेश होता.

नवीन जातींची सद्यःस्थिती

जेजू येथील कृषी संशोधन आणि विस्तार सेवा केंद्राने सेओल्ह्यांग, उलिह्यांग, मतनाबोंग, रेडस्टार, सनीट, विंटरप्रिन्स या नवीन जाती विकसित केल्या आहेत. विंटरप्रिन्स, कारा आणि हॅनाबॉन्ग या जातींच्या संत्र्यांची हरितगृह लागवड केली जाते.

- डॉ. मिलिंद लदानिया(लेखक केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था येथे माजी संचालक होते.)

टॅग्स :शेती क्षेत्रफळेमहाराष्ट्रशेतकरीशेती