Join us

डाळिंब बागा वाचवण्यासाठी कापडाचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 1:05 PM

बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व ऊन चट्टे, धुके, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे. त्यामुळे डाळिंब फळाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होते.

कायम दुष्काळी जत तालुक्यात बिब्या रोगाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्यासुरल्या डाळिंब बागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दरीबडची (ता. जत) येथे बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व ऊन चट्टे, धुके, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे. त्यामुळे डाळिंब फळाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होते. कमी पाणी, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे पीक असल्याने उजाड माळरानावर डाळिंब बागा फुलविल्या आहेत. बहुतांश शेतकरी मृग हंगामात जून, जुलै महिन्यात डाळिंबाचा हंगाम धरतात.

पूर्व भागातील संख, दरीबडची उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिद्धनाथ, आसंगी (जत) दरीकोणूर, वाळेखिंडी, जालिहाळ, बेवणूर, करजगी, बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी निगडी बुद्रुक येथील बागांना ऊन नसल्याने प्रतिकूल हवामानामुळे अपेक्षित कळी निघाली नाही. फळकुजवा, फुलगळती झाली. 

बागेत कुठेतरी थोडी फळे आली आहेत. त्याच्यावर तेलकट बिब्या रोगाने हल्ला चढवला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. बागेसाठी महागडी औषधी, खते, मशागत यावर खर्च केला आहे. बहरच वाया गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

पावसाने दडी मारल्याने टंचाई आहे. त्यातच उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. पहाटे सकाळी मोठ्या प्रमाणावर दव धुके पडत आहे. वाढत्या तापमानामुळे फळावर काळे डाग, ऊन चट्टे पडू लागले आहेत. झाडांवर बुरशीजन्य रोग, मर व इतर रोगाची शक्यताही आहे. डाग पडलेल्या फळांना दर कमी मिळतो. रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान व बिब्या रोगाच्या तडाख्यातून वाचलेल्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. संभाव्य धोक्यापासून बागा वाचविण्यासाठी शक्कल लढवली आहे.

ऊन चट्टा आणि बुरशीजन्य रोगापासून बागा वाचवण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी कागदी कपड्याने झाकण्याचे काम वेगात सुरु आहे. यातून डाळिंब बागांचे संरक्षण केले आहे, तसेच भांगलणीचीही कामे गतीने सुरू आहेत.

पहाटे दव, धुके पडत आहे. फळावर डाग पडू लागले आहेत. त्यापासून संरक्षणासाठी खास बनविलेल्या कागदाने झांडे झाकून घेतली आहेत. त्यामुळे फळांवर डाग पडत नाही. फळाला शायनिंग येते. -सीताराम माळी, डाळिंब शेतकरी, दरीबडची

टॅग्स :फळेशेतकरीपाऊसपीकजाटतापमानकीड व रोग नियंत्रण