Join us

ढगाळ हवामान आणि आंबा बागेचे व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 11:26 AM

मागील ४ ते ५ दिवस हवामान ढगाळ आहे. तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी परीसरात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे.

मागील ४ ते ५ दिवस हवामान ढगाळ आहे. तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी परीसरात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. अनेक आंबा बागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पालवी आलेली आहे तर काही बागांमध्ये मोहोर फुटण्यास सुरुवात झालेली आहे. पाऊसामुळे व धुक्यामुळे पालवीवर तसेच मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगामुळे पालवीवर व मोहोरावर तपकिरी रंगाचे ठिपके उठुन पालवी व मोहोर खराव होण्याची शक्यता आहे.

तसेच हवामान ढगाळ असल्यामुळे तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी पालवी व मोहोरातुन रस शोषल्यामुळे पालवी व मोहोराचे नुकसान होऊन त्यातुन चिकट असा द्रव बाहेर पडतो सदर द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ज्या बागामध्ये पहिली फवारणी होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे अशा बागांमध्ये डॉ. बा.सा.को.कृ. विद्यापिठाच्या शिफारसीनुसार आंबा पिकावर दुसरी फवारणी घेण्यात यावी. यासाठी १० लिटर पाण्यात ५% प्रवाही लॅम्बडासायहॅलोथ्रिन ६ मिली व कार्बडेन्झिम १० ग्रॅम एकत्र मिसळून फवारणी घ्यावी. ज्या बागांमध्ये पहिली फवारणी झालेली नाही अशा बागांमध्ये विद्यापिठाने शिफारस केलेली पहिली फवारणी तातडीने घेण्यात यावी. यासाठी डेल्टामेथ्रिन १० लिटर पाण्यात ९ मिली व कार्बडेन्झिम १० ग्रॅम एकत्र मिसळुन फवारणी घ्यावी.

संभवित ढगाळ व दमट वातावरणामुळे आंब्याच्या नविन येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येण्याची शक्यता असते. अशा वेळी पालवीचे सतत निरीक्षण करावे व प्रादुर्भाव दिसुन आल्यास किडग्रस्त शेंडे, काड्या काढुन अळीसह नष्ट कराव्यात. लॅमडासायहॅलोथ्रिन ५% प्रवाही ६ मिली किंवा क्विनॉलफॉस २५% प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी केलेले किटकनाशक पालवीवरती चिटकुन राहण्याकरीता व सर्वत्र पसरण्याकरीता किटकनाशकाच्या द्रावणात स्टीकर व स्प्रेडर मिसळून फवारणी करावी.

सद्यस्थितीतील ढगाळ व आर्द्र वातावरण आंब्यामध्ये नविन येणाऱ्या पालवी व मोहोरावरती अनुक्रमे करपा व भुरी रोगांसाठी पोषक आहे. त्यामुळे भविष्यातील आंबा पिकाचे नुकसान टाळण्याकरीता विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या वेळापत्रकाखेरीज विशेष खबरदारी म्हणुन आंबा बागेत बुरशी नाशकाची फवारणी घेणे आवश्यक आहे. नियंत्रणासाठी २३% प्रवाही अझॉक्सीस्ट्रॉबीन १० मिली प्रति १० लिटर पाणी व टेब्युकोनॅझॉल ५०% + ट्रायफलॉक्सीनस्ट्रॉबीन २५% दाणेदार १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. फवारणीच्यावेळी किटकनाशक/बुरशीनाशक द्रावणामध्ये स्टीकर/स्प्रेडर सारखा चिकट पदार्थ १ मिली/१ लि. पाणी याप्रमाणात मिसळावा.

ग्रामीण कृषि मौसम सेवाउद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

टॅग्स :आंबाहवामानशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणफळे