सध्या कोकणात तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागातही नारळ लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कुठल्याही यशाचे गमक त्या कामातील पूर्व नियोजन हे असते. त्याचप्रमाणे शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळविण्यासाठी नियोजन हे फार महत्वाचे आहे.
त्यामुळे पूर्वनियोजन असेल तर पुढे फारशा अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. नारळ लागवडीत देखिल पूर्वनियोजन गरजेचे असून ते करताना खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
दोन झाडातील अंतर
- नारळ लागवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे तो म्हणजे दोन माडातील अंतर दोन माडात योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
- यासाठी नारळ झाडाच्या झावळीच्या रचनेची माहिती करून घेणे गरजेचे आहे. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झावळीची लांबी १५ फूट असते.
- वजनामुळे झावळीला धनुष्यासारखा आकार येतो. त्यामुळे झावळीचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर १२.५ फूट असते.
- म्हणून दोन माडात २५ फूट (७५ मीटर) अंतर असेल तर माडाच्या झावळ्या एकमेकात शिरणार नाही किंवा एकमेकांना झाकणार नाहीत.
- योग्य प्रमाणात उत्पन्न मिळवण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात २५ फूट (७.५ मीटर) अंतर ठेवणे गरजेचे आहे.
- परंतु पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची झाल्यास २० फुटाचे अंतर ठेवले तरी चालेल. तसेच बुटक्या जातींसाठी देखील २० फूट अंतर चालू शकते.
खड्ड्याची आवश्यकता
- पिकांच्या मुळांना वाढीसाठी अधिक अनुकूल परिस्थिती मिळावी म्हणून पेरणीपूर्वी आपण जमिनी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करतो तशाच पद्धतीने फळझाडे लागवड करताना खड्डा खोदणे जरुरीचे आहे.
- खड्ड्याचा आकार हा फळझाडे आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. खड्डा खोदल्याने त्यातील दगड वाहेर काढले जातात. त्याचप्रमाणे स्पर्धा करू शकतील अशा झाडांची मुळे तोडली जातात.
- खड्ड्यातील मातीत खते चांगल्या प्रकारे मिसळणे शक्य होते. सुरवातीच्या काळात मुळांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते. त्यामुळे झाडे पुढे प्रतिकूल परिस्थितीस तोंड देऊ शकतात.
खड्ड्याचा आकार
- खड्ड्याचा आकार जमिनीच्या प्रकार अवलंबून असतो. वरकस किंवा मुरूमयुक्त जमीन तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे.
- अशा जमिनीत १x१x१ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत परंतु समुद्र किंवा नदी किनाऱ्यावरील पुळणीची जमीन, गाळ मिश्रित जमीन, रेताड, मध्यम काळ्या आणि भारी काळी जमिनीत थोडा लहान आकाराचा खड्डा खोदला तरी चालू शकेल.
- खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे.
खड्डा भरणे
- रेताळ, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाला कमीत कमी १ ते २ टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी.
- तसेच खड्डा भरताना आणखी १ ते २ टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते.
- परंतु पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला १ ते २ टोपल्या रेती वाळू घालावी.
- तसेच खड्डा भरताना १ ते २ टोपल्या रेती मातीत मिसळावी. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी सोडणाचा थर दिल्यास उत्तमच.
- त्याद्वारे जमिनीत ओलावा टिकून राहतो तसेच खड्डा भरताना खड्ड्यात ४ ते ५ घमेली शेणखत ५.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० ग्रॅम फॉलीडॉल पावडर खड्ड्याच्या मातीत मिसळावी.
- जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत त्याचप्रमाणे ज्या जमिनीत पाणी साचते अशा ठिकाणचे खड्डे पूर्ण भरून वर थोडी भर द्यावी.
- परंतु जमीन उताराची असल्यास आणि पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचणार नाही अशी खात्री असल्यास खड्डे अर्ध्यापर्यंत भरावेत.
- उरलेली माती खड्ड्याच्या वरील बाजूवर वरंबा करण्यासाठी वापरावी म्हणजे पावसाळ्यात बाहेरचे पाणी खड्ड्यात येणार नाही पुढे जसजसा माड वाढत जाईल तस तशी खड्ड्यात भर घालावी.
अधिक वाचा: Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत