Join us

Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 9:30 AM

कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे या उपचाराचा करावा अवलंब..

बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या गोगलगायींना वेळीच ओळखून नियंत्रण केल्यास शेतकरी पिकांच्या नुकसानीपासून वाचू शकतील.

शंखी पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांश शंखी गर्द, करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही कीड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते; तसेच नवीन रोपे, कोंब, भाजीपालावर्गीय पिके, फळे, फुले तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यांवर उपजीविका करते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीची खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावी, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत; जेणेकरून गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावित शेतातील शंखी गोगलगायी व त्यांना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.

रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावित शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. रासायनिक उपयोजनेमध्ये मेटाल्डिहाईड भुकटीचा २.५ टक्के वापर गोगलगायीच्या मार्गात केल्यास पिकाच्या दोन ओळींत किंवा प्रादुर्भाव क्षेत्रात केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण करता येते.

पोती भिजवून शेतात टाकावीत

गुळाच्या द्रावणात एक किलो गूळ प्रती १० लिटर पाणी गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळेस शेतात पिकाच्या ओळींत पसरून द्यावीत. त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करून उकळत्या पाण्यात किवा साबणाच्या द्रावणात वा केरोसीनमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात किंवा खोल खड्यात पुरून वरून चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा.

लहान गोगलगाईच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी. शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतील बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच पट्टा टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.

शंखी गोगलगाईच्या नियंत्रणासाठी सामूहिकरीत्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे उपायांचा अवलंब करावा. - बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

हेही वाचा - White Grub Management संधी सोडू नका; हिच ती वेळ हुमणी कीड नियंत्रणाची

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनबीडखरीप