भारतातील एकूण भात लागवडीपैकी जवळ जवळ ३५ टक्के क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहे तसेच एकूण तृणधान्य उत्पादनापैकी ३५ टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात आहे.
भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.
१) तपकिरी तुडतुडे
• तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात परिणामी पाने पिवळी पडतात, वाळतात व जळल्यासारखी दिसतात.
• शेतात तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार पिकाचे दळे दिसतात यालाच 'हॉपर बर्न' म्हणतात.
नियंत्रणाचे उपाय
• लावणी दाट करु नये. दोन ओळीतील अंतर २० सें.मी. आणि दोन चुडातील अंतर १५ सें.मी. ठेवावे.
• शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा.
• नत्र खताची मात्रा माती परिक्षण शिफारशीनुसार वाजवी प्रमाणात द्यावी.
• नियंत्रणासाठी अॅसिफेट ७५ टक्के १४ ग्रॅ. किंवा डायक्लोरोव्हास ७६ टक्के १० मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ टक्के २० मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. किंवा थायामेथॉक्झाम २५% डब्ल्युजी २ ग्रॅम/१० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
• कीटकनाशक फवारा फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवड्यानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
२) लष्करी अळी
• पतंग तपकिरी रंगाचा असून सुरुवातीस अळी हिरवट रंगाची असते व तिच्या दोन्ही बाजूस पांढर पिवळसर पट्टा असतो नंतर ती किंचीत करड्या रंगाची होते.
• पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खाल्ली जातात.
• रोपवाटीकेत हल्ला झाल्यास जमिनीलगत रोपे कापल्यासारखी दिसतात.
• रात्रीच्या वेळी अळ्या लोंब्यांवर चढतात आणि लोंब्या कुरतडुन खातात.
नियंत्रणाचे उपाय
• भाताची लागण केलेल्या शेतात पाणी बांधून ठेवावे, त्यामुळे अळ्यांना लपायला जागा राहत नाही आणि अळ्या रोपावरती चढतात व पुढे त्या पक्षांच्या भक्ष्यस्थानी सापडतात.
• नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑन २ टक्के भुकटी २५ किलो/हेक्टर धुरळावी किंवा डायक्लोरोव्हास ७६ टक्के १३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• पीक तयार झाल्यावर ताबडतोब कापणी करावी अन्यथा ते किडीच्या हल्ल्यास बळी पडते.
अधिक वाचा: भातशेतीमध्ये खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापर या झाडाचा पाला