Join us

कोथिंबीरीपेक्षा धण्यात मिळतोय जास्त नफा, कशी कराल धणे लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 1:29 PM

धणे किंवा कोथींबीर या पिकांना भारतात व भारताबाहेर वर्षभर मागणी असते. या पिकांच्या पानांचा उपयोग जेवणाच्या थाळीचे सौंद्य वाढविण्यासाठी व चवीमध्ये वेगळेपण आणण्यासाठी आवर्जून केला जातो. यात धणे लागवडीमधून जास्त नफा मिळतो आहे.

मसाला बियाणे पिके अंतर्गत मेथी, सोप, धणे, शेपू ही भाजीपाला पिके मुख्यत्वे भारतात तयार होणाऱ्या एकूण एकोणीस मसाला बियाणे पिकांपैकी मुख्य मसाला बियाणे पिके आहेत. तसेच ओवा, जिरे, सोवा, काळेजिरे, अनिसे, कसुरी मेथी इ. ही मसाला बियाणे पिकेसुध्दा काही राज्यात उत्पादीत केली जातात.

परंतु तुलनात्मकदृष्ट्या त्यांचे क्षेत्र कमी असल्याने त्यांचे स्थान दुय्यम पिकात मोडले जाते. धणे हे अॅपिअसी कुटुंबातील महत्वाचे मसाल्याचे पीक आहे. धणे किंवा कोथींबीर या पिकांना भारतात व भारताबाहेर वर्षभर मागणी असते. या पिकांच्या पानांचा उपयोग जेवणाच्या थाळीचे सौंद्य वाढविण्यासाठी व चवीमध्ये वेगळेपण आणण्यासाठी आवर्जून केला जातो.

भारतात होऊ शकणाऱ्या अनेक मसाला बियाणे पिकामध्ये धन्याचा लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत अग्र क्रमांक लागतो. हे पीक उष्णकटीबंधीय प्रदेशात येते परंतु धण्याकरिता हे पीक फुलावर असताना वातावरण कोरडे व थंड असणे गरजेचे आहे. धणे लागवडीकरिता जमिन कुठल्याही प्रकारची असली तरी चालू शकते. परंतु कोरडवाहु पिक पद्धतीमध्ये हे पिक फक्त भारी जमिनीत घ्यावे. कारण फुलोरावस्थेत पाणी धरून ठेवणारी व उपलब्ध करून देणारी जमिनच या पिकाकरिता निवडणे गरजेचे आहे.

रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रात धण्याच्या लागवडीकरिता जमीन तयार करताना जमिनीतील ओलावा निघुन जाणार नाही यांची काळजी घ्यावी. धणे पिकाच्या उत्पादनाकरीता विदर्भातील हवामानाचा विचार करता रब्बी हंगामात या पिकाची लागवड केल्यास अतिशय चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते असे आढळून आले आहे.

जातीधणे पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन केंद्र, अजमेर, राजस्थान या केंद्र शासनाच्या अधिनस्त असणाऱ्या संस्थेने आणि भारतातील कृषि विद्यापीठांनी खालील जातीचे प्रसारण केले आहे.एसीआर - १ ही राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्था, अजमेर येथुन २००६ मध्ये प्रसारीत केलेली जात आहे. ही जात कोथींबीरीची पाने व धणे निर्मीतीकरीता वापरता येते. धण्याचे बी गोलाकार असून मध्यम आकाराचे आहे. या बियामध्ये ०.५ ते ०.६ टक्के तेलाचे प्रमाण आढळून आले. भुरी व काळा दाणा या रोगास प्रतिबंधक आहे.आरसीआर - ४३६कृषी महाविद्यालय, जोबनेर, राजस्थान यांच्याकडुन १९९५ मध्ये निवड पद्धतीने विकसित जात आहे. कोरडवाहू पध्दतीने लागवडीस योग्य जात आहे. १००० दाण्याचे वजन १० ते १३ ग्रॅम असून लवकर तयार होणारा (९०-११० दिवस) वाण आहे. हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन देणारा वाण म्हणुन प्रसिध्द आहे.जीसीआर - २ जागुदान (गुजरात) येथील अखिल भारतीय समन्वयीत मसाला बियाणे संशोधन प्रकल्पातुन २००७ मध्ये निवड पध्दतीने ही जात प्रसारित करण्यात आली आहे. कोरडवाहू पिक परिस्थितीत लवकर लागवडीकरिता (ऑक्टोबर-नोव्हेंबर) ही अतिशय महत्वाची जात आहे. साधारणपणे ११०-११५ दिवसात तयार होणारी आणि हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पन्न देणारी ही जात आहे.

बिजप्रक्रियाधणे लागवडीकरिता लागणारे बियाणे, जमिनीचा प्रकार, बियाण्याचा आकार, जमिनीतील ओलाव्याचे लागवडीचे वेळी प्रमाण मुख्य म्हणजे ओलिताखाली किंवा कोरडवाहू क्षेत्रातील यावर अवलंबुन असते. ओलितासाठी १०-१२ किलो प्रति हेक्टरी आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी २० किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे बियाणे लागते. लागवडीपूर्वी धने बियाण्यास रगडुन घेऊन बियाण्याचे दोन भाग होतील ही काळजी घ्यावी. यानंतर थायरम २ ग्रॅम प्रती किलो बियाणे + ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे चोळून घ्यावे.

अधिक वाचा: कमी वेळात आर्थिक नफा देणारी कोथिंबीर लागवड कशी करावी?

लागवडीची पध्दतसर्वसाधारणपणे धने उत्पादन करण्यासाठी या पिकाचा कालावधी १२० ते १३० दिवस असल्याने या पिकाची लागवड पेरीव पध्दतीने करावी. त्यासाठी दोन ओळीतील अंतर ६० से. मी. जमीनीचा मगदूर बघून करावी. भारी जमिन असल्यास हे अंतर ७५ से.मी. पर्यंत वाढवण्यास हरकत नाही. टोकण पद्धतीने धने लागवड करता येते, त्यासाठी दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. दोन झाडातील अंतर ४५ सें. मी. ठेवावे. लागवड करताना खोली २.५ से.मी. पेक्षा जास्त ठेवू नये.

पाणी व्यवस्थापनओलिताखालील धणे लागवडीसाठी भारी जमिनीत ३ ओलीत आणि हलक्या जमिनीत ५ ते ६ ओलिताची गरज आहे. परंतु फुलोरावस्था, बिजधारणा या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

खत व्यवस्थापनधणे हे पिक खत व्यवस्थापनास अतिशय चांगला प्रतिसाद देते. लागवडीपूर्वी २० टन चांगले कुंजलेले शेणखत प्रति हेक्टरी द्यावे. सोबतच रासायनिक खतांची ६०:३०:३० क्विंटल नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टरी शिफारस करण्यात आलेली आहे. अर्धा नत्र आणि पूर्ण स्फुरद व पालाश ही खते फुलोरावस्थेत द्यावी. उर्वरित अर्धा नत्र धण्याची दुधाळ अवस्था असताना द्यावा.

उत्पन्न/काढणीलागवडीपासुन धणे काढणीपर्यंत जातपरत्वे १०० ते १५० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. कोरडवाहू पिक परिस्थितीमध्ये ६ ते ७ क्विंटल प्रति हेक्टर तर ओलित व्यवस्थापनाअंतर्गत १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे.

सर्वसाधारणपणे धणे पिकाची काढणी बियांना तपकीरी रंग येण्याच्या अवस्थेत करतात. यासाठी धण्याच्या पेंड्या बांधून सरळ उन्हात न ठेवता सावलीमध्ये सात ते आठ दिवस साठवून ठेवतात व नंतर काठीने बदडून बियाणे वेगळे करतात किंवा आधुनिक मळणी यंत्राद्वारे धण्याचे बियाणे वेगळे करता येते. बाजारपेठेत हिरव्या रंगाच्या धन्यास अधिक भाव मिळत असल्याने, या पिकाची काढणीची अवस्था अत्यंत महत्त्वाची आहे.

राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्था, अजमेर यांचे शिफारशीनुसार धण्याच्या बियामधून दूधासारखा पांढऱ्या रंगाचा चिकट पदार्थ बोटाने दाबल्यानंतर निघण्याच्या अवस्थेत या पिकाची कापणी करून त्यांच्या पेंड्या/जूड्या बांधतात व त्यानंतर झाडांच्या मूळ्या वरच्या दिशेने ठेवून या पेंड्या/जूड्या दोन ते तीन आठवडे लटकवून ठेवतात व नंतर त्याची मळणी करावी. म्हणजे बाजारपेठेत अपेक्षित असणारे हिरव्या धन्याचे उत्पादन मिळते.

रोग१) भुरी : हा धण्यावरील महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा कोथिंबीरीच्या पानावर व कोवळ्या फांद्यावर पांढऱ्या पट्ट्याच्या स्वरूपात येतो.उपाय :अ) पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी २५ किलो प्रति हेक्टरी फवारणी करावी.ब) लागवडीपूर्वी धणे बियाण्यास थायरमची बिजप्रक्रिया करावी.२) मर : धण्याच्या पिकातील कोवळी झाडे या रोगास बळी पडतात. या बुरशीमुळे हा रोग होतो. झाडाची पाने पिवळी पडतात व नंतर फांद्या पिवळ्या पडून झाडे मरतात.उपाय : अ. लागवडीपूर्वी थायरमची बियाण्यास प्रक्रिया करावी. ब. तसेच धणे बियाण्यास ट्रायकोडर्माची ४ ग्रॅम प्रति किलोप्रमाणे प्रक्रिया करावी.

किडमावा : ही किड पाने, फुले व फळांमधील रस शोषण करतात. या किडीचा जास्त प्रार्दुभाव झाल्यास ५० टक्के उत्पादन कमी होते.उपाय :अ) किडींची लक्षणे दिसताच निंबोळी अर्काची ५ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.ब) इमीडाक्लोप्रीड या किटकनाशकाची ०.००५ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.

टॅग्स :पीकशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन