मागील दोन ते तीन दिवसात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.
अशा परीस्थीतीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. कापूस पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे.
कसे कराल व्यवस्थापन
- कापूस पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत.
- शक्य असेल तिथे वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
- आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत ) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी.
- या प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.
- वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.
- पिकाची वाढ पुर्ववत होऊन पाते लागण होण्यासाठी पिक ६० दिवसाचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
- त्यासाठी कोरडवाहू कपाशीकरीता ३१ किलो तर बागायती कपाशीकरीता ५१ किलो निमकोटेड यूरीया प्रति एकरी द्यावा.
- कापूस सध्या पाते व बोंडे अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर नैसर्गिक पातेगळ होत असेल तर याच्या नियंत्रणाकरीता एनएए या संजीवकाची ४० मिली प्रति १८० लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकरी किंवा २.५ मि.ली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी यामुळे नैसर्गिक पातेगळ थांबण्यास मदत होते.
- बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.
- पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
- सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% - २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
- बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन २०% - १० ग्रॅम किंवा मेटीराम ५५% + पायराक्लोस्ट्रोबीन ५% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल २५% - १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन १८.२% + डायफेनोकोनॅझोल ११.४% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - १० मिली किंवा प्रोपीनेब ७०% - २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी
- कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी.
- वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
- लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.
- फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
- किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
०२४५२-२२९०००
अधिक वाचा: Soybean Crop Management : अतिवृष्टीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?