Join us

कमी पाण्यातील शेतीसाठी सेंद्रिय हायड्रोजेलची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 9:17 AM

हायड्रोजेल पीक लागवडीनंतर मुळाच्या कक्षेत दिल्यानंतर साधारणपणे २-३ महिने पाणी टंचाईच्या काळात ४२-४५ डिग्री सेंटीग्रेट तापमानातही आणि पिकाच्या गरजेच्या केवळ ४०-५० टक्के पाण्यात पिके तग धरू शकतात.

ब्राम्हणशेवगे ता. चाळीसगाव येथील श्रीराम पवार हे मुळात BE (Mech.) पदवीधर आहेत. त्यांच्या परिसरातील उन्हाळी कापूस लागवड करणारे शेतकरी आत्महत्या त्यांना जलसंशोधनाकडे वळवण्यात कारणीभूत ठरल्या. त्यांचे म्हणणे असे आहे की, साधारणपणे मे महिन्यात  शेतकरी उन्हाळी बागायती कापसाची लागवड करतात ते असे गृहित धरुन की, जूनच्या सुरवातीला पाउस पडेल आणि तोपर्यंत आपल्याकडे जे काही पाणी उपलब्ध आहे ते पाणीकापूस पिकाला ठिबकने देवूत. परंतु अलिकडच्या काही वर्षात जूलैअखेरपर्यंत समाधानकारक पाउस होत नाही अन् शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर कापसाचं पीक पाण्याअभावी एकतर जळून जातं किंवा नंतर त्यापासून अतिशय कमी उत्पादन मिळतं. परिणामी काही हळवे शेतकरी पुढील संभाव्य संकटाची जाणीव होत असताना आत्महत्यानेआपलं बहुमोल आयुष्य संपवतात. आसपास घडणारी ही घटना संवेदनशील मनाच्या श्रीराम पवार यांना व्यथित करायची आणि यावर काही उपाय शोधता येईल का या उद्देशाने त्यांनी “सेंद्रिय हायड्रोजेल” ची निर्मिती केली व त्याच्या पेटंट मिळविणेसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

“वॅाटर फॅार प्लँट” या संकल्पनेतून तयार केलेले सेंद्रिय हायड्रोजेल पावडर व जेल स्वरुपात असून त्याचा एकरी खर्च अनुक्रमे ₹ १०००/- व ₹ १२००/- असा आहे. यात हे हायड्रोजेल पिकाच्या मुळाच्या कक्षेत म्हणजे जमिनीत १५-२० सें.मी. खोलवर टाकण्यास लागणारा मजूरी खर्च गृहित धरलेला नाही. श्री. पवार यांच्या म्हणणेनुसार हे हायड्रोजेल पीक लागवडीनंतर मुळाच्या कक्षेत दिल्यानंतर साधारणपणे २-३ महिने पाणी टंचाईच्या काळात ४२-४५ डिग्री सेंटीग्रेट तापमानातही आणि पिकाच्या गरजेच्या केवळ ४०-५० टक्के पाण्यात पिके तग धरू शकतात.ठिबक सिंचन पद्धतीवर घेतलेल्या पिकांना यामुळे खूप कमी पाणी दिले तरी चालते. श्री. पवार यांनी या हायड्रोजेलचा वापर सुरूवातीला स्वतःच्या शेतावर, नंतर काही मित्रांच्या शेतावर आणि त्यानंतर परिसरातील शेतकरी बांधवांच्या मध्यम, भारी, चुनखडीयुक्त तसेच मुरमाड जमिनीत केला. त्यावेळी कोरफड, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, वन क्षेत्रातील काही झाडे तसेच डाळींबासारख़्या फळपिकांवर या हायड्रोजेलचा वापर केला गेला. सुरूवातीला २.५-३ एकरवर सुरु केलेला वापर हा शेवटी २५-३० एकरपर्यंत त्यांनी वाढवत नेले. त्यांच्या मते एवढ्या प्रदीर्घ (२-३ महिने) काळात जमिनीत कुठलीही बुरशी या हायड्रोजेलभोवती आढळली नाही. 

राहूरी कृषि विद्यापीठात आणि आयसीएआर, नवी दिल्ली या संस्थेच्या देशभरातील संशोधन नेटवर्कमध्ये गेली अनेक वर्षे हायड्रोजेल विषयक संशोधन व त्याचा विविध पिकांसाठी व विविध प्रकारच्या जमिनीत वापर करुन निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. श्री. पवार यांच्या या सेंद्रिय हायड्रोजेलच्या चाचण्या मोठया प्रमाणात, व्यापक क्षेत्रावर घेतल्यास त्यांना सध्या मिळालेल्या निष्कर्षावर शिककामोर्तब होईल विद्यापीठातील शास्रज्ञांच्या मदतीने तसेच जलसंधारण विज्ञानाच्या आधारे सर्व निकषांचा वापर करुन खोलवर अभ्यास केला गेला तर हे तंत्रज्ञान शाश्वत संशोधनात परिवर्तित होईल.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात तापमानवाढ अटळ असून पिकांसाठी पाण्याची उपलब्धताही मर्यादित राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संशोधन ही काळाची गरज आहे. श्री. पवार यांना विद्यापीठात सध्या कार्यरत असलेल्या संबंधित शास्रज्ञांनी आमंत्रित केलेले आहेच व त्यांनी विद्यापीठात जावून चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितलेही आहे.प्रकाश सुनिल पवार96996 51743शब्दांकनकल्याण देवळाणकर

टॅग्स :पीकपीक व्यवस्थापनकापूससेंद्रिय शेतीपाणीठिबक सिंचनशेतकरी