नांदेड जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या असून पिके हवेला लागली आहेत. त्यासोबत अनावश्यक असणारे गवतदेखील वाढत असल्याने ते नष्ट करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या तणनाशकांची फवारणी करत आहेत.
मात्र अनेकजण चुकीच्या पद्धतीने तणनाशकाची फवारणी करत असल्याने त्याचा फायदा होताना दिसत नाही; तर जमिनीत ओलावा असताना तणनाशकाची फवारणी केल्यास ते अधिक फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला आहे. थोडीशी उघडीप मिळताच शेतकरी तणनाशक फवारणीकडे वळले आहेत.
कृषी केंद्रांवर विविध प्रकारची तणनाशके उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. काही शेतकरी कोरड्यावरच फवारणी करीत आहेत; तर काही शेतकरी जमिनीत ओलावा असल्यावर फवारणी करीत आहेत. ओलावा असतानाची फवारणीच अधिक फायद्याची ठरताना दिसत आहे.
गवत काढण्यासाठी मजूर मिळेना, मजुरी परवडेना
ग्रामीण भागात शेतात निंदणकामासाठी मजुरांचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पूर्वीसारखे शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी तणनाशक फवारणीकडे वळले आहेत.
जमिनीत ओलावा असतानाच फवारा तणनाशक
जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच फवारणी करणे अधिक फायद्याचे असते. तण कोवळे असताना फवारल्यास तणनाशक त्यावर मारक ठरते. कोवळे तण लवकर मरते.
तणनाशकाचे प्रकार
सूचीपर्णी पिकांसाठी (गहू) : गहू, भात, ऊस, ज्वारी, आदी पिकांमध्ये २, ४-डी हे हार्मोनवर्धक तणनाशक फवारले जाते.
चपट्या पानांच्या पिकांसाठी (कपाशी) : कापूस पिकांतील तणनाशक फवारण्यासाठी पेंडीमेथैलिन याची फवारणी केली जाते.
राउंडअप (समूळ उच्चाटन) : सर्व प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी जेव्हा पीक उभे नसेल तेव्हाच राउंडअप फवारणी केले जाते.
फवारणीनंतर पिकांना पाणी द्यावे का?
शक्यतो जमिनीत ओलावा असतानाच तणनाशकांची फवारणी करावी; कारण तणनाशक फवारणीनंतर पाणी दिल्यास तणनाशकाचा तेवढा परिणाम होणार नाही.
तणनाशकाच्या टाकीचा अन्यत्र वापर नको
तणनाशक फवारणी केलेली टाकी तसेच फवारणी पंप लगेच दुसऱ्या पिकांवर फवारणीसाठी उपयोगात आणू नये. तो पंप स्वच्छ, गरम पाण्याने साफ करूनच त्याचा वापर करावा.
तणनाशकाचा पिकांवर परिणाम
बाजारात अनेक प्रकारची तणनाशके उपलब्ध आहेत. पिकांमध्ये कोणत्या प्रकारचे तण अधिक आहे, त्यानुसार तणनाशक खरेदी करावे. चुकीचे तणनाशक फवारणी केल्यास पिकांना याचा फटका बसतो..
जमिनीवरही विपरित परिणाम
जमिनीची गुणवत्ता आणि प्रकार बघूनच तणनाशक फवारणी करावे. अनेकदा हलक्या जमिनीत घातक तणनाशक फवारणी केल्यास याचा पिकांच्या उत्पादनासह जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
फवारणी करताना घ्यावी विशेष खबरदारी
तणनाशक फवारणी करताना जमिनीत ओलावा असावा, वातावरण चांगले असावे, स्वच्छ पाणी, स्वच्छ पंप, कीटकनाशकापासून तणनाशक दूर ठेवणे, आदी काळजी घ्यावी लागते.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी