Join us

Crop Management : खरिपातील सोयाबीन, कापूस, मका पिकांवरील कीड-रोगांचे असे करा व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 2:31 PM

Crop Management : पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून त्यावर विविध किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून सल्ला देण्यात येत आहे.

Crop Management : खरिपातील पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून फुलोऱ्यात आलेल्या पिकांना किडींचा आणि रोगंचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सोयाबीन, कापूस आणि मका ही राज्यातील प्रमुख पिके असून या काळात शेतकऱ्यांना रोगांवर नियंत्रण करणे महत्त्वाचे असते. 

सोयाबीन पिकांवर खोडमाशीचा प्रादुर्भाव, अळी, कापसातील रशशोषण किडी, मका पिकांवर लष्करी अळीच्या प्रादुर्भाव होत आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाने यासंदर्भातील पीक सल्ला दिला आहे.

१. सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून पावसाची उघडीप पाहून फवारणी घ्यावी.

२. सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन (कामगंध) सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.

३. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि आर्थिक नुकसान पातळी नंतर प्रोफेनोफॉस ५० ई सी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.

४. कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) प्रादूर्भाव दिसून येत असुन यांच्या व्यवस्थापनासाठी असीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के

४० ग्रॅम किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. ५. कपाशी पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एकरी किमान ४ ते ५ कामगंध सापळे लावावे.

६. कापूस पिकात पाणी साचल्यामुळे मर आणि मूळकूज रोग लक्षणे आढळलेल्या शेतात, रोगग्रस्त रोपाच्या सुरुवातीच्या काळात व निरोगी रोपांच्या बाजूस रोग व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून मुळापर्यंत जाईल अशी आळवणी पावसाची उघडीप पाहून करावी.

७. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी किवां मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम (२ x १० ८ CFU) किंवा नोमुरीया रीलाई १.१५ टक्के (२ x १० ८ CFU) ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

८. मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम १२.६% लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी २.५ मीली प्रती लीटर पाण्यात किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी, ३ मीली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघड बघुन करावी.

९. भात पिकांत निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्विनोलफॉस २५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून पावसाची तीव्रता कमी असताना व स्टीकरचा वापर करून फवारावे.

१०. मुग पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक व्यवस्थापन