Join us

Protect Crops in Heavy Rain : या परिसरात अतिवृष्टी झाली, तरीही सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 1:41 PM

Protect Crops in Heavy Rain : जास्त पाऊस पडला किंवा अतिवृष्टी झाली, तर शेतातल्या पिकांचे नुकसान होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात शेतकऱ्यांनी असे काही केले की त्यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही.

यंदाच्या हंगामात कृषी विभागाने विशेष मोहीम राबवून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात २५ हजार हेक्टरवर कापूस, तर १५ हजार असे एकूण ४० हजार हेक्टर पिकांवर सोयाबीनची बीबीएफ व बेड पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. परिणामी, अतिवृष्टीतही या पिकांना फटका न बसल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे.

नागपूर विभागीय कृषी सहसंचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सोयाबीन व कापूस ही दोन पिके बीबीएफ आणि बेड पद्धतीने लागवडीची संकल्पना शेतकऱ्यांसमोर मांडली. त्यासाठी वरोरा तालुक्यात शेगाव (बु.) ३५० शेतकरी, राळेगाव-गुजगव्हाण ४०० शेतकरी व चिनोरा २५० शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.

पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये थोडा बदल केल्यास कसा फायदा होतो, हे पटवून दिले. त्यामुळे प्रशिक्षित शेतकऱ्यांना यंदा तालुक्यात कापूस पिकाची २५ हजार हेक्टर व सोयाबीन १५ हजार हेक्टर क्षेत्रावर बेड पद्धतीने लागवड झाली. पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला; पण बेड पद्धतीच्या पिकांचे काहीही नुकसान झाले नाही. या प्रयोगाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासाठी तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे यांच्या मार्गदर्शनात शेगाव मंडळ कृषी अधिकारी विजय काळे व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

बेड पद्धत बेड मेकरने बेड तयार करून त्यावर डिबलर यंत्र किंवा हाताने सोयाबीन अथवा कपाशीची लागवड केली जाते. या पद्धतीने थेट मुळाखाली पाणी साचत नाही. तिथे हवा खेळती राहते. जाेमदार वाढ होऊन पीक निरोगी राहतात. बेडवर लागवड केलेल्या क्षेत्रात पावसाने नुकसान आढळून आले नाही. या पद्धतीला रुंद वरंबा सरी पद्धती, असेही म्हटले जाते.

बीबीएफ पद्धत बीबीएफ हे पेरणीयंत्र आहे. याद्वारे चार ओळींत पेरणी होते. दोन बाजूने व्ही. आकाराचे पास लावले जाते. त्याद्वारे झाडाच्या बाजूने नाली तयार होऊन पेरणी उंचावर येते. अतिवृष्टी झाली तरी झाडाचे नुकसान होत नाही. नालीत साचलेल्या पाण्याने ओलावा मिळत राहतो. पारंपरिक लागवड पद्धतीत पावसाचे पाणी साचून पिके पाण्याखाली येतात.

खरीप हंगामापूर्वी शेगाव बु. येथे प्रशिक्षण घेतले. पारंपरिक पद्धतीने लागवड न करता यावर्षी बेडवर चार एकरावर सोयाबीन लागवड अष्टसूत्री पद्धतीने केली. अतिवृष्टीतही पिकाची वाढ चांगली झाली. अतिवृष्टीतही पीक वाचले. त्यामुळे एकरी उत्पादनात चार ते पाच क्विंटल वाढ होण्याची आशा आहे. नथ्थू तिखट, शेतकरी, धानोली

चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११०० ते १३०० दरम्यान आहे. अतिवृष्टीने दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके बेडवर टोकन पद्धतीने लागवड करण्याचे प्रशिक्षण दिले. अतिवृष्टीतही पिके सुरक्षित राहिली आहेत. -शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :खरीपपाऊसशेतीशेती क्षेत्र