Join us

एका एकरात केली शिमला मिरचीची लागवड, सहा महिन्यात ५.१५ लाखांचा मिळवला नफा  

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 06, 2023 8:00 PM

पैठण तालुक्यापासून अवघ्या २३ किमीवर हर्षी गाव. कृष्णा आगळे यांनी जानेवारी महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली. केवळ एका एकरतलं ...

पैठण तालुक्यापासून अवघ्या २३ किमीवर हर्षी गाव. कृष्णा आगळे यांनी जानेवारी महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली. केवळ एका एकरतलं पिक. शेडनेटमधल्या वातावरणाच्या संतुलानामुळे दोन-एक महिन्यात मिरच्या येऊ लागल्या आणि सुरुवात झाली मिरचीच्या विक्रीस..पुणे, मुंबई करत करत शिमला मिरची सुरतेपर्यंत पोहोचली. व्यापारी जागेवर खरेदी करत होते. "सात महिन्यात साधारण सव्वा पाच लाखांचा नफा मिळाला बघा ताई". कृष्णा आगळे खुशीत सांगत होते. 

" माझी एकूण नऊ एकर शेती. त्यात मोसंबी, ऊस, रेशीम लावली आहे.  काही एकरात तूर, सोयाबीन, कपाशी पण आहे. आंतर पिक मिरचीचं घेतलं. मागच्या वर्षी अनुदानावर शेडनेट बांधलं एका एकरात. १९ जानेवारीला शिमला मिरचीची लागवड केली होती. मार्चमध्ये शिमला निघण्यास सुरुवात झाली. पिक घेत असताना या पिकाला  मजूर जास्त लागतात. पण आम्ही मजूर न लावताच घरच्या घरी पिक घेतलं. आमच्या दोघांसोबत आई वडिलांनीसुद्धा खूप कष्ट घेतले. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे जरा अडचण झाली नाहीतर भरपूर उत्पादन झालं असतं. मात्र, तरीही जवळपास सव्वापाच लाख रुपये नफा मिळाला."

 नानाजी देशमुख कृषी सहाय्य योजनेतून १८.१५ लाखांचं अनुदान आणि स्वखर्च ४ लाखांचा.शेडनेटला बांधण्यास लागणारी ही तब्बल २३ लाखांची भरभक्कम गुंतवणूक.  केवळ एक एकरातून नऊ एकर शेतीमधील उत्पादनापेक्षा चांगलं उत्पादन शेडनेटमुळे मिळालं. मी आणि माझी पत्नी मिरचीचे पीक घेण्याअगोदर पुण्यातून प्रशिक्षण घेऊन आलो होतो.

'शेडनेट आणि ओपन शेतीमध्ये फरक पडतो.' कृष्णा आगळे सांगत होते. बाहेर तापमान खूप असतं त्यामध्ये मिरचीचे पीक घेता येत नाही. त्यापेक्षा शेडनेटमध्ये पीक चांगल्या दर्जाचे निघते. त्यावर संतुलित वातावरणामुळे चमक आलेली असते. त्यामुळे माल विकलाही जातो. 

बीएपर्यंत शिक्षण झालेले कृष्णा आगळे आणि त्यांची पत्नी जयश्री आगळे केवळ शेतीच करत नाहीत तर त्यांनी दोन गुंठ्यात त्यांनी 'नर्सरी' ही सुरू केली आहे. आतापर्यंत दोन लाख रुपये विकली गेली. रोपवाटिकेतूनही सव्वा सहा लाख रुपयांचा नफा मिळाल्याचे ते सांगतात.

पैठणमधील अनेकांना शेडनेटमध्ये पीक घेतल्यामुळे फायदा झाल्याचे शेतकरी सांगतात. पोकरा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी सहाय्य योजनेतून शेडनेट घेण्यासाठी शेतकऱ्याला अनुदान मिळते. बाह्य वातावरणाच्या असंतुलनापासून वाचण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या शेडनेटमुळे पीक चांगले येते. यासाठी शेतकऱ्यांना वेळेच्या वेळी निर्जंतुकीकरण, ठिबक, बुरशीनाशके वापरून पिकांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते.

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन