Lokmat Agro >स्मार्ट शेती > Custard Apple : थ्रिप्स, मावा अन् पिठ्या ढेकूण; असं करा सिताफळातील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

Custard Apple : थ्रिप्स, मावा अन् पिठ्या ढेकूण; असं करा सिताफळातील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

Custard Apple Thrips, fruit and pitta lumps; Do so Integrated Management of Pests and Diseases in Sitafruit | Custard Apple : थ्रिप्स, मावा अन् पिठ्या ढेकूण; असं करा सिताफळातील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

Custard Apple : थ्रिप्स, मावा अन् पिठ्या ढेकूण; असं करा सिताफळातील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

Custard Apple Crop Management : सध्या राज्यातील सिताफळ लागवड क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून फळधारणेस अनुकूल परिस्थिती आहे. परंतु सततच्या पावसाने बागांमध्ये आर्द्रता टिकून राहत असल्याने रोग व किडींच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण तयार झाले आहे.

Custard Apple Crop Management : सध्या राज्यातील सिताफळ लागवड क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून फळधारणेस अनुकूल परिस्थिती आहे. परंतु सततच्या पावसाने बागांमध्ये आर्द्रता टिकून राहत असल्याने रोग व किडींच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण तयार झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Custard Apple Crop Management : सिताफळ हे कोरडवाहू भागातील महत्वाचे फळपिक आहे. चालू वर्षी उन्हाळा फार कडक असल्याने राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती होती. परंतु मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नैसर्गिक बहर धरलेला आहे. सध्या राज्यातील सिताफळ लागवड क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून फळधारणेस अनुकूल परिस्थिती आहे. परंतु सततच्या पावसाने बागांमध्ये आर्द्रता टिकून राहत असल्याने रोग व किडींच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण तयार झाले आहे. पूर्णपणे उमललेल्या कळ्या व लहान आकाराच्या  फळांवर तपकिरी काळपट डाग आढळून येत आहेत. 

सिताफळाच्या दर्जेदार उत्पादनाकरीता रोग व किडींचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सिताफळावर आढळणाऱ्या रोग व किडींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

१. थ्रिप्स (फुलकिडी)
या किडीचे प्रौढ आणि पिल्ले आकाराने अतिशय सुक्ष्म असतात. प्रौढ आणि पिल्ले नवीन आलेल्या कळ्या, नुकतीच फलधारणा झालेली फळे, पानाच्या पाठीमागील बाजूची मुख्य शिर यांच्या पृष्ठभाग खरवडून बाहेर पडणारा द्रव शोषून घेतात. पाने वेडीवाकडी होतात. परिणामी नुकसान झालेला भाग तपकिरी रंगाचा होतो आणि कालांतराने काळपट पडतो. मोठ्या फळांवरदेखील खरवडलेले डाग दिसून येतात. फळ वाढेल तसे खरवडल्याचे डाग वाढत जातात व प्रादुर्भावग्रस्त भाग कठीण होतो. फळांचा आकार वेडावाकडा होतो. फळांना बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. या किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास प्रादुर्भाव वाढत जातो. 

२. मावा 
या किडीचे प्रौढ आणि पिल्ले नवीन आलेल्या कळ्यांमधून रस शोषून घेतात. ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवते, ज्याच्यावर काळी बुरशी वाढते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास फळधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.                                

थ्रीप्स व मावा किडीसाठी उपाययोजना - 
1) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आंतरप्रवाही रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. 

3. पिठ्या ढेकूण (मिलीबग)
पिठ्या ढेकुण ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करते. परिणामी पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो. झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो. ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवते, ज्याच्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने, फळे काळी पडतात. फळांना बाजारभाव मिळत नाही. 

उपाययोजना 
1. पिठ्या ढेकणाची पिल्ले खोडावरून झाडावर चढतातयासाठी उपाय म्हणून ५  सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिक चिकट पट्टी खोडाला चिकट बाजू वर राखून लावावी, त्यामुळे पिल्ले चिकटून मरून जातात व या किडीस वेळीच आळा बसतो.
2. परभक्षी मित्रकीटक क्रिटोलिमस मॉन्ट्रोझायरी प्रती एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची बागेवर फवारणी करू नये.
3. लेकेनोसिलियम लेकानी (व्हर्टीसिलीयम लेकॅनी) हे जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम अधिक फिशऑईल रोझीन सोप ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. आर्द्रतायुक्त हवामान असल्यास ही फवारणी करावी.
4. या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रथम बुप्रोफिजिन १.५ मिली, तदनंतर बव्हेरिया बेसियाना हे जैविक कीटकनाशक ६ ग्रॅम,  नंतर ॲझाडिरेक्टीन  १०००० पिपिएम् ३ मिली व शेवटी लेकेनोसिलियम लेकानी (व्हर्टीसिलीयम लेकॅनी) ६ ग्रॅम + गाईचे दूध ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून चार फवारण्या पिठ्या  ढेकणाचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने कराव्यात.

4.  टि मॉस्कीटो बग 
 ‘टि मॉस्क्युटो बग' या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव सिताफळावर आढळून येत आहे. किडीची पिल्ले व प्रौढ सिताफळाच्या झाडांची कोवळी फुट, कळ्यांचा व फुलांचा देठ, कोवळी व पक्व फळे या भागामधून रस शोषून घेतात. या किडीची पिल्ले व प्रौढ ज्या ठिकाणी सोंड घुसवून रस शोषण करतात, त्या ठिकाणच्या पेशी काळ्या पडून कठीण होतात. रस शोषण केल्यामुळे तयार झालेल्या ठिपक्यांचा आकार मोठा होतो व करपल्यासारखा काळा पडतो. या किडीमुळे होणाऱ्या जखमांमधून फळसड रोगाच्या बुरशीचा प्रवेश होऊन पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेंडेमर, शेंडे करपणे, कळ्या जळणे, फळे देठाजवळ काळी पडणे यासारखी लक्षणे दिसून येतात. 

उपाययोजना 
सदर कीड सिताफळाच्या बागेत कमी प्रमाणात आढळून आली तरी आर्थिक नुकसान पोहोचविण्याची क्षमता या किडीमध्ये जास्त असलेने व्यवस्थापनासाठी कीड सर्वेक्षण अत्यंत गरजेचे आहे. 
1) सिताफळाच्या बागेत स्वच्छता राखावी. 
2) नियोजनबद्ध एकात्मिक खत व पाणी व्यवस्थापन करणे.
3) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास झाडांवर लँब्डा सायहॅलोथ्रीन ५ ईसी  ६ मिली  किंवा बायफेन्थ्रीन ८% एससी  १२.५  मिली  किंवा थायोक्लोप्रिड २१.७० % एससी १० मिली या किटकनाशकांची प्रति १० लि. पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. किटकनाशकांची फवारणी करताना काढणी पश्चात कालावधी तपासून पाहावा.  
(सीताफळामध्ये या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचे लेबल क्लेम नाही. चहा पिकामध्ये मात्र वरील  रासायनिक कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे. त्यांचा केवळ संदर्भ येथे दिला आहे.)

५. फळसड 
हा रोग कोलेटोट्रीकम ग्लिओस्पोराइडेस या बुरशीमुळे होतो. हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात अधिक दिसून येतो. मात्र कोरड्या हवामानात रोगाचे प्रमाण कमी असते. रोगाच्या वाढीसाठी साधारणतः उष्ण हवामान २५ ते ३०  अंश सें. ग्रे. तापमान आणि भरपूर आर्द्रतेची (८० टक्के पेक्षा जास्त) आवश्यकता असते. तसेच बुरशीचे बीज अंकुरण्यासाठी  कमीत कमी ४ ते ६ तास झाडाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांची आवश्यकता असते. 

फळसड हा रोग फळवाढीच्या कुठल्याही अवस्थेत येऊ शकतो. मात्र कळया आणि लहान फळे रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कळया व लहान फळे तसेच त्यांचे देठ काळे होऊन गळून पडतात. फळे मध्यम सुपारीच्या आकाराची (१५ ते २० मि.मी. व्यास) झाल्यावर प्रादुर्भाव झालेली फळे गळून न पडता लटकून राहतात. रोगट फळे न पिकता वाळून जातात व कडक होतात. अशाप्रकारे या रोगामुळे जवळजवळ ६० ते ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता असते.

उपाययोजना 
1. बागेतील जमिनीची  नांगरट आणि खणणी करावी व जमीन चांगली तापू दयावी म्हणजे जमिनीत असणा-या रोग आणि किडींचा नाश होईल.
2. रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने बागेतील स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. छाटणी करताना झाडावर शिल्लक राहीलेली रोगट फळे, रोगट फांदया, पाने, गर्दी होत असलेल्या फांद्या छाटून छाटणीनंतर सर्व रोगट अवशेष गोळा करुन जाळून टाकावे.
3. बहाराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळयापूर्वी पाणी देण्यासाठी झाडांभोवती वाफे करुन सेंद्रीय व रासायनिक खताचा हप्ता द्यावा. त्यामुळे रोग किडी विरुध्द प्रतिकारशक्ती वाढते.
4. फळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास १ टक्के बोर्डो मिश्रणाच्या (१ किलो चुना आधिक १ किलो मोरचूद प्रती १०० लीटर पाणी) किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात  १५  दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ फवारण्या घ्याव्यात. 

श्री. नितीश घोडके - ९९६०९८१५४८ 
डॉ. युवराज बालगुडे - ९८९०३८०६५४  
डॉ. प्रदीप दळवे
अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके (अंजीर व सिताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे

Web Title: Custard Apple Thrips, fruit and pitta lumps; Do so Integrated Management of Pests and Diseases in Sitafruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.