Join us

जपानकडून गायीच्या शेणावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची चाचणी

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 20, 2023 7:30 PM

शाश्वत आणि मुबलक संसाधनाद्वारे केलेल्या या स्थिर चाचणी जागतिक अंतराळ संशोधनाच्या अनेक कक्षा रुंदावणार

गायीच्या शेणापासून आता रॉकेटचे इंजिन चालू लागले आहे!  जपानच्या एका कंपनीला नुकतेच गायीच्या शेणापासून रॉकेट चालवण्यात यश मिळाले आहे. अंतराळ प्रगतीला यामुळे एक नवी दिशा मिळाल्याचे बोलले जात आहे.

इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज या जपानी अंतराळ कंपनीने ही यशस्वी चाचणी केली. हे रॉकेट शेणापासून मिळणाऱ्या मिथेन वायूचा इंधन म्हणून वापर करते. शाश्वत आणि मुबलक संसाधनाद्वारे केलेल्या या स्थिर चाचणी जागतिक अंतराळ संशोधनाच्या अनेक कक्षा रुंदावणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा इंजिन चाचणीत झालेला गायीच्या शेणाचा झालेला वापर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या भल्याचा पर्यायाने बायोमिथेनची व्यवहार्यता दर्शवणारा ठरणार आहे.

जपानमधील स्थानिक पशुपालकांकडून खरेदी केलेल्या गायीच्या शेणाचा वापर या रॉकेटच्या इंजिनमध्ये करण्यात आला होता. रॉकेटचे इंजिन सुरु होण्यासाठी लागणारे इंधन पूर्णपणे या गायीच्या शेणापासून बनल्याचे सांगण्यात आले आहे. ही चाचणी जपानमधील ताईकी या शहरात करण्यात आली. या चाचणीदरम्यान रॉकेटचे इंजिन १० सेकंदासाठी प्रज्वलित झाले. ज्यातून एक शक्तीशाली निळी ज्योत निर्माण केली. हे यश युरोपीय स्पेस एजन्सीच्या शेण इंधन रॉकेट इंजिनचे अनुकरण करत असली तरी असा प्रयोग करणारी ती पहिली खासगी कंपनी ठरली आहे.

खर्च झाला कमी

शुन्य ज्वलन कक्ष आणि स्पेस एक्स च्या इंजिनात वापरल्या गेलेल्या पिंटल इंजेक्टरचा अवलंब यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढली आहे. पारंपरिक इंजिनचा उत्पादनाचा खर्च या प्रयोगाने एक दशांशाने कमी केला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही घटल्याचे या कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी फायद्याचे

येणाऱ्या काळात जर हे प्रयोग केले जाऊ लागले तर शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी अंतराळात वापरल्या जाणाऱ्या गोबरगॅस आणि संबंधित प्रयोगांसाठी, इंधनासाठी मोठी मदत होणार आहे. या प्रयोगामुळे इंधनाचा मोठा स्त्रोत जपानमध्येच उपलब्ध झाल्याने इंधनासाठी बाहेरच्या देशांवरील अवलंबित्व आता कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शेतीतंत्रज्ञानदुग्धव्यवसाय