डाळिंब पिकात मोठ्या प्रमाणात सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे आपण निवडलेली आंतरपिके त्याला कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे बागेत कोणती आंतरपीके घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत? हे पाहणे जरुरीचे आहे.
ताग व इतर हिरवळीची खते असलेली पिके डाळिंबामध्ये आंतरपिक म्हणून घ्यावीत. नंतर ही पिके जमीनीमधे गाडावीत. त्यामुळे मातीतील फायदेशीर असणारी सुक्ष्मजीवांची संख्या वाढते व जमिनीचा पोत सुधारतो.
मका, गहू, ज्वारी, बाजरी, मोहरी ही पिके घेतल्याने सुत्रकृमींच्या संख्या कमी होते. सुत्रकृमीचा प्रादुर्भाव झालेल्या बागेत अफ्रीकन झेंडू (वाण-पुसा बंसती गेंदा) ची लागवड करावी. चांगल्या परिणामांसाठी हे पिक सलग ६ ते ७ महिने ठेवावे.
आंतरपिक म्हणून कांदा, टोमॅटो, मिर्ची, वांगी, बटाटा, ढोबळी मिरची, गाजर, हरभरा, उडीद, तुर, मुग, राजमा, सोयाबीन, वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी, टरबुज, खरबुज, फुलांमध्ये जरबेरा, ग्लॅडीओलस इ. सुत्रकृमीच्या वाढीस पोषक ठरणारी पिके घेणे टाळावे.
वेलवर्गीय पिकांमुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे अनेक रोगांचा, सुक्ष्मजीवांचा फैलाव वाढतो; म्हणून त्यांचा आंतरपिक म्हणून वापर टाळावा. त्याचबरोबर फळपिके, पालेभाज्या आणि फुलपिके यात फुलकिडीचा प्रादुर्भाव सातत्याने होत राहतो; त्यामुळे अशी पिके घेणे टाळावे.
पालेभाज्या व फुलपिकांमध्ये अनेक किटकांच्या सुप्त अवस्था जतन होतात म्हणून ही पिके आंतरपिक म्हणून टाळावीत.
अधिक वाचा: Kardai Lagvad : करडईचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी कसे कराल लागवड व्यवस्थापन वाचा सविस्तर