सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दशपर्णी अर्क होय. दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे.
दशपर्णी अर्कास सेंद्रीय शेतीत खुप महत्वाचे स्थान आहे. नावाप्रमाणेच या अर्कात १० वेगवेगळया प्रकारच्या वनस्पतीचा उपयोग केला जातो. वेगवेगळया उग्र वासाच्या वनस्पतीचा पाला यात वापरला जातो. दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खुप फायदेशिर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होवू शकतो.
दशपर्णी अर्कासाठी वनस्पतीचा वापर
कडुनिंब पाला ५ किलो, एरंडपाला २ किलो, गुळवेलपाला २ किलो, घाणेरीपाला २ किलो, पपईचा पाला २ किलो, सिताफळाचा पाला २ किलो, रूईचा पाला २ किलो, पांढरा धोतरा २ किलो, करंजपाला २ किलो, लाल कन्हेरपाला २ किलो, झंडु पाने, निरगुडी, बेशरम, पेरू इत्यादी २ किलो.
इतर साहित्य
प्लास्टीक टाकी २०० लिटर, देशी गायीचे शेण ३ किलो, देशी गायीचे गोमुत्र ५ लिटर, हिरवी मिरची ठेचा २ किलो, लसून ठेचा पाव किलो, वरीलपैकी कोणत्याही १० वनस्पतीचा पाला घ्यावा. एखाद दुसरी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालु शकतो. शक्यतो देशी गायीचे शेण ताजे घ्यावे, सुकलेले वापरू नये. गोमुत्र जितके जूने तेवढा त्याचा औषधी गुणधर्म जास्त असतो. दशर्णी अर्क तयार करतांना तो सावलीच्या जागी करावा. दशपर्णी अर्क तयार झाल्यानंतर वस्त्रगाळ करण्यासाठी सुती कापडाचा वापर करावा.
दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत
यापैकी करंज, रूई, सिताफळाचा पाला, कडुनिंबाचा पाला, महत्वाचा बाकीचे सर्व उपलब्ध असतील त्यानूसार घेणे सर्व मिळुन १० वनस्पती होणे गरजेचे आहे. वरील सर्व वनस्पती बारीक करून घेणे तसेच तिखट हिरवी मिरचीचा ठेचा, लसून ठेचा, देशी गायीचे शेण व गोमुत्र हे सर्व मिश्रन २०० लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये सडविण्यासाठी सावलीत ठेवून ते गोणपाटाने झाकून ठेवावे आणि दिवसातून कमीत कमी २ वेळा हे मिश्रन काठीने घडाळाच्या काटयाप्रमाणे ढवळावे व पुन्हा गोणपाटाने झाकुन ठेवून असे मिश्रन १ महिणाभर ठेवल्यानंतर त्याला उग्र वास येतो त्यानंतर हे मिश्रन सुती कापडाने गाळून घ्यावे.
दशपर्णी अर्काचा वापर
दशपर्णी अर्क तयार केल्यापासून ३ महिण्यापर्यंत वापरता येतो. मात्र अर्क बंद झाकनाच्या कॅनमध्ये व्यवस्थित ठेवलेला असावा. दशपर्णी हा तयार झालेला अर्क किड नियंत्रणासाठी १६ लिटर पाण्याला २०० मिली फवारणीसाठी वापर करावा. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी.
दशपर्णी अर्काचे फायदे
मित्र किडीचे संवर्धन होवून नैसर्गिक पद्धतीने किड नियंत्रण होण्यास वाव मिळतो. उग्र वासामुळे किडी पिकांमध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होतात. रासायनिक किटकनाशकाचा वापर कमी झाल्याने पिकांवर किडनाशकांचे अंश राहात नाहीत. अर्क फवारणीमुळे लहान अळया, रसशोषक किडी व किडींची अंडी अवस्थेचे निर्मुलन होते. पर्यावरणपुरक किड नियंत्रण झाल्याने सकस व विषमुक्त भाजीपाला उत्पादित होतो व शेती मालास सेंद्रीय म्हणून उत्तम दरही मिळतो.
अर्काचा वापर करतांना
अर्कापासून नियंत्रित होणाऱ्या किडी तुडतुडे, मावा, फुलकिडे, पहिल्या २ अवस्थेतील अळया यांच्यावर प्रभावी काम करते याची फवारणी शक्यतो दर ८ दिवसाला करावी.
प्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभागदादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३ मो.नं. ७८८८२९७८५९.
हेही वाचा - 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ