जमिनीची धूप होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे पाहणे आवश्यक ठरते. कोणत्या शक्तीकरवी धूप घडवून येते याचा आढावा घेतल्यास पुढील शक्तींचा प्रामुख्याने समावेश होतो. पाणी, वारा, जिवाणू, भूगर्भातील क्रियाशील असलेल्या घडामोडी, बर्फ, सुर्याची प्रखर उष्णता इ.
जमिनीच्या धुपीचे प्रकार
पाण्याकरवी जमिनीची होणारी धूप
सुरवातीस पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर जमिनीकडून शोषले जाते. पाऊस जसजसा पडू लागतो तसतसे पाणी जमिनीत मुरू लागते किंवा जमिनीकडून शोषले जाते. जमिनीची जलअतंसरण शक्ती संपली म्हणजे बाकीचे पावसाचे पाणी जमीन शोषण करून घेऊ शकत नाही. त्यामुळे ते पाणी जमिनीवर साचू लागते आणि मग साचलेले पाणी अधिक झाल्यावर उताराच्या दिशेने वाहू लागते. कधी कधी पावसाची तीव्रता जास्त असल्यास पावसाचे बहुतांशी पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने जोरात वाहत जाते, आणि जाताना आपल्याबरोबर प्रंचड प्रमाणात माती वाहून नेते. या वाहणाऱ्या पाण्यालाच पाण्याची अपधाव (Runoff) असे म्हणतात. हे वाहणारे पाणी पुढील गोष्टींवर अवलबून असते.
- जमिनीचा प्रकार
- मातीतील ओलिताचे प्रमाण
- जमिनीचा उतार
- त्या सभोवताली पडणारा पाऊस व हवामान
- जमिनीवरील वाढलेले गवत तथा वनस्पती
जमिनीची धुप करण्याकरीता पाणी दोन प्रकारे कार्य करते
- मातीचे कण पृष्ठभागापासून अलग करणे
- मातीचे स्थलांतर करणे
पहिले कार्य पावसाच्या थेंबाव्दारे उघड्या जमिनीवर प्रामुख्याने होते. पावसाचे थेंब आकाशातून पडताना जमिनीवर वेगाने आदळतात. त्यामुळे माती उकलली जाऊन ढिली होते आणि पाण्याबरोबर वर उचलली जाते. पुढे ही वर आलेली माती वाहत्या पाण्यात मिसळून पाण्याबरोबर वाहू लागते. पावसाच्या थेंबाचा उघड्या व विशिष्ट जमिनीवर होणारा परिणाम थेंबाची संख्या व आकार आणि जमिनीवर आदळण्याची गती यावरून धुपीचे प्रमाण ठरवितात. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचे मुख्य कार्य म्हणजे पावसामुळे अलग झालेली माती अथवा मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे हे होय. हेच पाणी जास्त प्रमाणात व खोल वाहत राहिल्याने पुढे बारीक नाल्या किंवा ओघळ तयार होतात. पाण्याकरवी होणाऱ्या धुपेचे खालील प्रकार पडतात.
पाण्याकरवी होणाऱ्या धुपीचे प्रकार
१) सालकाढी धूप
२) ओघळपाडी धूप
३) घळपाडी धूप
४) प्रवाह काठकापी धूप
५) सागरजन्य धूप
१) सालकाढी धूप
कमी उताराच्या जमिनीवरून अशा प्रकारची धूप होत असते. जमिनीवरील मातीचा पातळ थर पावसाच्या पाण्याबरोबर निघून जातो. ही क्रिया दरवर्षी होते व मातीचा पातळ थर (साल) नकळत नष्ट होतो. अति पाऊस झाला की पाणी गढूळ बनते आणि नदीनाल्यास मिळते. मातीचे सूक्ष्मकण पाण्यात मिसळल्यामुळे पाणी गढूळ होते. हे मातीचे कण फार उपयुक्त आणि मोलाचे असतात. पिकाचे उत्पादन अशा जमिनीवर कमी कमी होत जाते. कणाकणाने वरची सुपीक माती वाहून गेल्याने जणू जमिनीचे फूल अथवा जमिनीची सालच पाण्याबरोबर वाहून जाते. साल काढणारी ही धूप प्रथम मुंगीच्या पावलाने येते आणि नंतर महाभयंकर स्वरूप धारण करते.
२) ओघळपाडी धूप
सालकाढी धुपीच्या पुढची स्थिती म्हणजे ओघळपाडी धूप होय. जमिनीवरून पावसाचे पाणी वाहून जात असताना जमिनीत लहानलहान ओघळी पडू लागतात. म्हणूनच या धुपीस ओघळपाडी धूप असे म्हणतात. प्रथम पडणारी लहान घळ कालातंराने मोठी होते. अशा अनेक ओघळी जमिनीवर पडतात. काही लहान असतात काही मोठ्या असतात. काही लांब काही रूंद तर काही खोल असतात. सुरूवातीला औताच्या साहाय्याने हया घळी बुजविता येतात. ओघळीमुळे औतांना अडथळे निर्माण होतात आणि नंतर लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत जाते.
३) घळपाडी धूप
सालकाढी धुपीनंतर, ओघळपाडी धूप व त्यानंतर घळपाडी धूप होते. या धुपीमुळे मोठमोठ्या घळींच्या जाळ्या दिसतात. मशागतीला अडचण येते. सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. पाणी जोराने शिरते आणि घळी पुन्हा खोल व रुंद होत जातात. म्हणूनच ओघळ लहान असतानाच ती बुजविणे आवश्यक आहे.
४) प्रवाह काठकापी धूप
आकाशातून पावसाचे थेंब जमिनीवर आदळतात, एकत्र येतात आणि पाण्याच्या रूपाने वाहतात, नंतर पाणी वाहण्याचा वेग वाढतो. जमिनीची धूप होते. ओघळ उत्पन्न होतात. ओघळीतून घळी आणि घळीतून नाले उगम पावतात. नाले नदीस जाऊन मिळतात. नदीकाठच्या जमिनी धुवून जातात. नदया नाल्यांचे काठ वाहत्या पाण्याने धुऊन जातात. काही वेळा काही ठिकाणी नद्या नाले आपल्या प्रवाहाची दिशा बदलतात. त्या वेळी प्रवाहाचे तळ रूंदावतात. पावसाळयात जेंव्हा नद्या नाल्यांना पूर येतो तेंव्हा होणारी धूप फार गंभीर स्वरूपाची असते. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग दर सेंकदाला दोन किंवा तीन फुटापेक्षा वाढला तर जमिनीची धूप होण्यास सुरूवात होते. वाहत्या पाण्याचा वेग जर याहून कमी असेल तर धुपीचे प्रमाण कमी असते. पाण्याच्या अशा प्रकारच्या मंदगतीला अधुपकारी गती (नॉन इरोजिव्ह मोशन) असे म्हणतात.
५) सागरजन्य धूप
पाण्याचे लहानसे ओघळ ओहोळांना मिळतात. ओहळांचे पाणी नाल्यांना मिळते. नाले नद्यांना मिळतात. नद्यांचे पाणी समुद्राला मिळते. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील प्रदेशाशी सतत टक्कर देतात, त्यावेळी किनाऱ्याच्या ढपल्या पडतात. प्रथम किनाऱ्याची जमीन धुवून जाते, तेथील जमिनी खाऱ्या पाण्याने व्यापून जातात आणि जमिनी खाऱ्या बनतात. म्हणून सागरजन्य धूप फार हानीकारक ठरते.
जमिनीच्या धुपेमुळे होणारे दुष्परिणाम
असुरक्षित जमिनीवरून दरवर्षी धुपून जाणारी माती प्रत्येक एकरामागे सर्वसाधारणपणे ५० टनापासून १२० टनापर्यंत वाहून जाते. सर्वसाधारणतः १ इंच मातीचा थर तयार होण्यास शेकडो वर्षे लागतात. म्हणजेच १ इंच माती धुवून नष्ट होणे, याचा अर्थ निसर्गाचे हजारो वर्षाचे कार्य नष्ट करणे होय. जमिनीच्या धुपीची वाढ होण्यास, जमिनीच्या शास्त्रबध्द मशागतीचा अभाव व पाण्याचा अयोग्य उपयोग यामुळे खालीलप्रमाणे नुकसान होते.
- सुपीक माती वाहून जाणे: जमिनीच्या वरच्या मातीचा थर पिकाच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. कारण पिकांची मुळे याच थरात असतात. जमिनीचा वरचा थर वाहून गेल्यावर खालचा थर कमी सुपीक असतो. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो आणि पिके असमाधानकारक येतात.
- धुपेमूळे वनस्पतीची अन्नद्रव्ये वाहून जाणे: पाण्याच्या वाहत्या धावेबरोबर लक्षावधी टन माती वाहून जाते हे आपण बघितलेच. त्याबरोबरच वनस्पती पोषक अन्नद्रव्ये वरच्या सुपीक थरातच जास्त असतात. हे सुध्दा मातीबरोबर मोठया प्रमाणात वाहून जातात.
- सुपीक जमिनीत वाळू साचणे: उंच भाग, टेकडी व पर्वताहून खाली आलेल्या प्रवाहाने प्रवाहाच्या खालच्या भागातील चांगली सुपीक शेते नापीक होण्याची भिती असते. वाऱ्याने जमिनीची धूप होणाऱ्या भागातही वाळूचे ढीग साचून चांगली जमीन वाया जाते व ती जमीन पुढील पीक उत्पादनाला निरूपयोगी होते, हा प्रकार नदी नाल्यांच्या प्रवाहामुळेही आजूबाजूच्या सुपीक शेतात होतो.
- तलावाच्या तळाशी गाळ साचणे: पाणलोटाच्या भागात जर जमिनीची धूप अनिर्बंधपणे चालू दिली तर तळ्यात किंवा तलावांत गाळ साचतो. त्यामुळे त्याची पाणी साचवून ठेवण्याची क्षमता कमी होते व त्याचे उपयुक्त आयुष्य घटते. हा गाळ दर वर्षी प्रचंड प्रमाणात खर्च करून उपसावा लागतो. याला एकमेव उपाय म्हणजे पाणलोट क्षेत्र सुरक्षित ठेवणे व भुपृष्ठावरून पळणाऱ्या पाण्याला प्रतिबंध करणे हाच होय.
- निचरा करणाऱ्या नाल्यात व पाण्याच्या तलावात गाळ साचणे: निचऱ्याचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात ओलिताचे पाणी वाहून नेणारे लहान मोठे कालवे यांच्या प्रवाही पाण्याबरोबर गाळ वाहून येतो व प्रवाह कमी गतीने वाहू लागला म्हणजे तळाशी साचतो. तो गाळ मोठया प्रमाणात साचताच पात्र उथळ होते व पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. हा गाळ नेहमी कालव्यातून बाहेर काढावा लागतो.
- जमिनीच्या अंतर्गत पाण्याची पातळी खाली जाणे: भू पृष्ठावरून जास्त पाणी वाहून जाऊ लागले म्हणजे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत पाणी कमी मुरते, म्हणजे विहिरीच्या पाण्याची आवक व भरपाई कमी होते. विहिरीत पाणी कमी आल्यामुळे ओलितावर परिणाम होतो व पिकाचे उत्पन्न कमी होते.
डॉ अनिल दुरगुडे
मृदशास्त्रज्ञ, मृदविज्ञान विभाग, म.फु.कृ. वि. राहुरी
डॉ. संतोष काळे
शास्त्रज्ञ, अर्ध शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था, हैदराबाद