दरवर्षी थंडीला सुरुवात झाली, की दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर होते. शेवटी आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागते. यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये भात, गहू पिकांची कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतातच जाळले जातात. दिल्ली, 'एनसीआर'मधील वाढत्या प्रदूषणास हेही एक कारण आहे. इतरही राज्यांतील बहुतांश शेतकऱ्यांचा कल पिकांचे अवशेष जाळण्याकडेच असतो. असे केल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. सेंद्रिय कर्ब हा शेतीचा आत्मा आहे. त्याचे प्रमाण जमिनीत जितके जास्त तितकी जमिनीची सुपीकता चांगली राहते.
पीक अवशेष जाळण्याऐवजी ते शेतातच गाडले तर त्यापासून उत्तम सेंद्रिय खत होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. पीक अवशेषांपासून वीज तसेच इथेनॉल निर्मितीसुद्धा होते. परंतु, याकरिता शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन करावे लागेल. त्याचबरोबर या अशा प्रकल्पांना, उद्योगांना शासनाने चालना द्यायला हवी. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करणे, कमीत कमी मशागत, पीक फेरपालट, दरवर्षी सेंद्रिय खतांचा शेतात वापर, क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग पेरून गाडणे, उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर, पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर, चोपण जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा वापर आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व रासायनिक खतांचा प्रमाणबद्ध वापर असे तंत्र उपलब्ध आहे. याचा तुटक तुटक वापर काही शेतकऱ्यांकडून होतो. परंतु, त्याचा फारसा उपयोग होत नाही.
महाराष्ट्रात ऊस तुटून गेल्यावर शेतकरी सरास पाचट जाळतात, ते न जाळता योग्यरीत्या जमिनीत गाडले किंवा त्यावर कुजण्यासाठी प्रक्रिया केली तर ते मातीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
देशभरातील मातीच्या प्रकारानुसार विभागनिहाय सेंद्रिय कर्ब वाढविण्याची व्यापक अन् एकात्मिक मोहीम केंद्र राज्य शासनाने मिळून हाती घ्यायला हवी. या मोहिमेअंतर्गत सेंद्रिय कर्ब वाढीचा एकात्मिक कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर राबविण्यात यायला हवा. शून्य मशागत हेसुद्धा जगभर मान्यताप्राप्त एक शास्त्रीय तंत्र आहे. यामुळे मातीची धूप कमी होऊन पोत सुधारतो. याबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन व्हायला पाहिजे. जमिनीच्या आरोग्याबाबत अमेरिका वेळीच जागी झाली आहे. आपले डोळे कधी उघडणार, हा खरा प्रश्न आहे.
मच्छिंद्र ऐनापुरे
जत, जि. सांगली