सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यांकडून जिल्ह्यातील विविध तालुक्यात शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट पेटवून देतात. मात्र, हे पाचट पेटवून न देण्याचं आवाहन सोलापूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. उसाचे पाचट न पेटवता त्याची मशीनद्वारे कुटी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ऊस तोडणीनंतर शिल्लक राहणारे पाचट कुजवल्याने जमिनीचा पोत सुधारून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, असे कृषी विभागाने सांगितले.
जमिनीचे आरोग्य ही महत्त्वाची बाब बनलेली आहे. मागील वर्षात शेकडो एकर क्षेत्रावर पाचट कुजवण्यात आले आहे. त्यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊन उत्पन्न वाढले आहे. प्रोत्साहनपर पाचट कुटी यंत्रासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुदानदेखील देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सांगितले.
पाचट न जाळण्याचे फायदे काय?
- जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जिवाणू नष्ट होतात.
- पाचट ठेवल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
- जमिनीचा एक ते दीड टन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
- पाचट ठेवल्यामुळे रासायनिक खतांची उपलब्धता होते.
- नत्र, स्फुरद, सेंद्रीय कर्ब, पालाश याचा मोबदला मिळतो.
असा करा पाचटाचा वापर
उसाची तोडणी झाली की, ते जाळून किवा फेकून न देता ऊस लागवड असलेल्या क्षेत्रावर ते पसरून घ्यावे लागणार आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशीनद्वारे पाचटाची कुट्टी करून घेतल्यानंतर ती कुट्टी कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सुपर फाॅस्फेट खत टाकून पाणी द्यावे. यानंतर त्यामध्ये छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट हे जमिनीत चांगले मिसळते.
पाणी, वीजबिलात होतेय कपात
शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जिवाणूसंवर्धक खत समप्रमाणात टाकून उसाला पाणी देणे गरजेचे आहे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घेतल्यास पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पाचटामुळे पाणी व वीजबिलात बचत होते, तण नियंत्रण करता येते.
सुपीकता वाढून प्रदूषण घटते
जमीन सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होते. तसेच प्रदूषण घटते. त्यामुळे पाचट व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग यांच्या समन्वयाने पाचट व्यवस्थापनाबाबत गेल्या पाच वर्षापासून करत असलेल्या जनजागृतीमुळे सोलापूर जिल्ह्यात बहुतांश शेतकरी पाचाट न जाळता ते शेतातच कुजवत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.