अळंबीच्या विविध जातींची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते; परंतु बटण अळंबी, शिटाके अळंबी, भाताच्या पेंढ्यावर अळंबी व धिंगरी अळंबी, या चार जागतिक उत्पादनात अग्रेसर आहेत.
यापैकी बटण आणि शिटाके, या जाती थंड तापमानात (१६ ते १८ अंश सेल्सिअस) वाढणाऱ्या असून, भाताच्या पेंढ्यावर वाढणारी अळंबी उष्ण तापमानात (३० ते ४० अंश सेल्सिअस) वाढते, तर धिंगरी अळंबी सर्वसाधारण तापमानात (२० ते ३० अंश सेल्सिअस) वाढते.
अळंबीच्या जातीनुसार तिच्या वाढीसाठी लागणारे माध्यम वेगवेगळे असते. बटण अळंबी विशिष्ट प्रकारच्या कंपोस्टवर वाढते. शिटाके अळंबी विशिष्ट झाडांच्या भुशावर वाढते.
तापमान व माध्यमाचा विचार करता, अळंबीच्या सर्व जातींमध्ये धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी विशिष्ट तापमानाची अथवा माध्यमाची आवश्यकता नसते. यामुळेच कमीत कमी भांडवली खर्चात या अळंबीची लागवड करता येते. धिंगरी अळंबीच्या सुमारे ३५ प्रजाती व्यापारी तत्त्वावरील लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
यामध्ये प्रामुख्याने प्ल्युरोटस, प्ल्यु. सपिडस, प्ल्यू. यामोर, प्ल्यू. इओस, प्ल्यू. फोस्स्युलेंटस इत्यादी प्रजातींचा समावेश होतो. इतर जातींच्या तुलनेत या अळंबीच्या लागवडीची पद्धत अत्यंत सोपी असल्याने लागवड सहजपणे करता येते.
यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देणाऱ्या निवाऱ्याची गरज असते. मातीच्या विटा रचून बनवलेली अथवा पक्के बांधकाम केलेली खोली किंवा बांबूच्या भिंतीची खोली अथवा नारळ-सुपारीच्या झावळ्यांनी बंदिस्त केलेल्या आणि शाकारलेल्या झोपडीतही अळंबीची लागवड करता येते.
अनेक माध्यमांवर ही अळंबी वाढत असली तरी भाताचा पेंढा अथवा गव्हाच्या काडावर या अळंबीचे उत्पादन इतर माध्यमांपेक्षा जास्त येत असल्याने या दोन्हीपैकी एक माध्यम लागवडीसाठी वापरावे.
लागवडीसाठी वापरायचा पेंढा अथवा काड, नवीन हंगामातील आणि व्यवस्थित वाळलेला असावा. माध्यम जुने अथवा रोगट असल्यास अळंबीच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अळंबीचे गड्डे तयार करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करावा.
गरजेनुसार गड्ढे बनविण्यासाठी छोट्या अथवा मोठ्या आकाराचे असून, माध्यमात अळंबीची तंतुमय वाढ होताना हानिकारक बुरशी अथवा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यासाठी वापरलेले माध्यम, अळंबीचे बियाणे आणि मेहनत वाया जाते म्हणून छोट्या आकाराचे गड्ढे बनवावेत. यासाठी १५०-२०० गेजच्या ३५ बाय ५५ सेंमी मापाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करावा.
अळंबीची काढणी
- तयार झालेली अळंबी स्वच्छ सुरीने कापून काढावी.
- पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसांत पहिली काढणी करावी, अशा प्रकारे एकूण ३ ते ४ काढण्या घेता येतात.
- अळंबीचे ८० टक्के उत्पन्न पहिल्या आणि दुसऱ्या काढणीतच येते.
- एका गठ्यापासून ३ काढण्यांमध्ये सरासरी ८०० ग्रॅम ताजी अळंबी मिळते.
- लागवड नसताना अळंबीगृहात बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करावी.
- चांगले उत्पादन मिळवण्यासाठी अळंबीगृहात योग्य प्रकाश व खेळती हवा ठेवावी
अळंबीची साठवणूक
- अळंबी नाशवंत असल्याने शक्यतो ताजी असतानाच विकावी किंवा छिद्रे असलेल्या प्लास्टिक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी.
- मात्र, अशी अळंबी एक ते दोन दिवसांत विकावी, धिंगरी अळंबी उन्हामध्ये वाळवल्यास ३ ते ४ दिवसांत पूर्णपणे वाळते.
- वाळवलेल्या अळंबीचे वजन ओल्या अळंबीच्या वजनाच्या दहा टक्के होते.
- लागवडीसाठी अळंबीचे शुद्ध बियाणे खात्रीशीर संस्थेकडून गवे भरण्याआधी १ ते २ दिवस आधी आणून त्याचा वापर करावा.
- २० दिवसांपेक्षा जास्त जुने बियाणे वापरू नये.
- लागवड करण्यापूर्वी त्या जागेत असलेल्या हानिकारक बुरशी व किडींचा नायनाट करणे गरजेचे आहे.
- निर्जंतुकीकरण दोन पद्धतीने करता येते.
अधिक वाचा: साठवणुकीत धान्याला किड लागतेय; धान्य संरक्षणासाठी सोप्या पद्धती कोणत्या?