उन्हाळी हंगामात प्रतिकुल वातावरण (जादा तापमान व कोरडी उष्ण हवा) आणि पाणीटंचाई यामुळे भाजीपाला लागवड अतिशय मर्यादित स्वरुपात होत असल्याने भाजीपाला पिकास चांगले बाजारभाव मिळतात व शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी भाजीपाला हे अर्थाजनाचे एक प्रमुख साधन आहे.
यासाठी भाजीपाला पिकांची योग्य निवड करुन त्याचे दर्जेदार उत्पादन घेणे महत्वाचे असते. महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्या काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, ढेमसे, तांबडा भोपळा, कलिंगड, खरबुज इ. उन्हाळी भाजीपाला पिके घेतली जातात.
पिकांना आधार देणेकारली, काकडी, दोडका, घोसाळी, पडवळ या पिकांना ताटी पध्दतीने आधार देतात आणि दुधी भोपळा या पिकाला मंडप करतात.
ताटी पध्दतया पध्दतीमध्ये ६x३ फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रीजरच्या साहाय्याने ६ फुट अंतरावर सरी पाडावी व प्रत्येक २५ फुट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सज्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकाला १० फुट उंचीचे व ४ इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पध्दतीने २ फुट जमिनीत गाडावे.
मंडप पध्दतया पध्दतीमध्ये द्राक्षाप्रमाणेच मंडप तयार करतात. दोन ओळीतील अंतर अंतर १० ते १२ फुट आणि दोन वेलीतील अंतर ३ फुट ठेवून या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. त्यासाठी १० ते १२ फुट अंतरावर रीजरच्या साहाय्याने सरी पाडावी. नंतर पाणी चांगले बसण्याच्या दृष्टीने जमिनीच्या उतारानुसार दर २० ते २५ फुट अंतरावर आडवे पाड पाडावे व पाणी एकसारखी बसेल अशा पध्दतीने रान बांधून घ्यावे.
मंडपाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजुंनी प्रत्येक ५ ते ६ फुट अंतरावर १० फुट उंचीचे ४ इंच जाडीचे लाकडी खांब शेताच्या बाहेरील बाजूने झुकतील अशा पध्दतीने दोन फुट जमिनीत गाडावेत. खांब गाडण्यापूर्वी खांबाचा जो भाग जमिनीत गाडावयाचा त्या भागावर डांबर लावावे म्हणजे खांब कुजणार नाहीत.
मंडप तयार झाल्यानंतर ८ फुट उंचीची सुतळी घेवून त्याचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस वेल बांधावे. त्या सुतळीस पीळ देवून दुसरे टोक वेलीवरील तारेस बांधावे. वेल सुतळीच्या साहाय्याने वाढत असताना बगलफूट व तणावे काढावे पाने काढू नये. मुख्य वेल मंडपावर पोहचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.
अधिक वाचा: इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ
महत्वाचे१) मंडपासाठी लाकडी बल्या/डांब/खांब, तारा (१४ गेज, १० गेज)२) ८ ते १० फुट लांब, १० सेंमी. गोल.३) चारी बाजूंनी ताण द्यावा.४) १० गेज तार आडवी-उभी बांधावी.५) एका एकरासाठी साधारणपणे ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो.
ताटी आणि मंडप पध्दतीचे फायदे१) फळे जमिनीपासून ५ ते ६ फुट उंचीवर वाढतात त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ते सडत नाहीत. किड आणि रोगांचे प्रमाण कमी राहते.२) फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सुर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.३) फळांची तोडणी, औषधे फवारणी ही कामे सुलभ होतात.४) या पिकामध्ये ट्रॅक्टरच्या किंवा बैलाच्या साहाय्याने आंतरमशागत करुन उत्पादन खर्च कमी करता येतो.५) वेल मंडपावर पोहचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो त्यामुळे या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.६) या पध्दतीमुळे वेली आणि फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळे फळे एकसारख्या आकाराची चांगल्या प्रतीची मिळतात.७) या पध्दतीमुळे वेलींना चांगला सुर्यप्रकाश मिळतो त्यामुळे फळे लांब, सरळ चांगली पोसतात.८) दोन ओळींमध्ये जास्त अंतर असल्यामुळे अवजाराच्या साहाय्याने आंतरमशागत करणे सोपे होते.९) पिकांवर औषधे फवारणी करणे सुलभ होते.१०) फळांची तोडणी करणे, काम अतिशय जलद आणि चांगले होते.११) या पध्दतीमुळे उत्पन्नामध्ये २५-३० टक्के वाढ होते.१२) जास्त अंतरावर लागवड करत असल्यामुळे सुरुवातीला कमी कालावधीत येणारी आंतरपिके घेता येतात.
अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी