शेणखत हे शेतात वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सेंद्रिय खत आहे. मात्र त्याचा योग्य वापर केल्यावरच जास्त फायदा होतो. शेणखताचा वापर करताना ते चांगले कुजलेले असावे.
तसेच त्यात बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि सुडोमोनास फ्लुरोसन्स यांसारखे जैविक घटक वापरलेले असावेत. यासोबतच अर्धवट कुजलेले शेण टाकणे टाळावे. कंपोस्टिंग पद्धतीने शेणखत तयार करून वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत शेणखत वापरण्याच्या काही महत्त्वाच्या पद्धती तसेच शेणखत वापरतांना काय काळजी घ्यावी या विषयीची सविस्तर माहिती.
शेणखत चांगले कुजवावे
• शेणखत शेतात टाकण्यापूर्वी ते पूर्णपणे कुजलेले असावे.
• शेणखत चांगले कुजवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कंपोस्ट कल्चरचा वापर करावा.
• एक टन शेणखतासाठी १ किलो किंवा १ लिटर डी कंपोस्ट कल्चर पुरेसे असते.
बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी
• शेणखतामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि सुडोमोनास फ्लुरोसन्स यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा.
• यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पिके सुरक्षित राहतात.
शेणकिड्यांचे नियंत्रण
• शेणखतातील कीड नियंत्रित करण्यासाठी मेटारायझियम ऍनिसोप्ली आणि बिव्हेरिया बॅसियाना या जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
प्रदूषण टाळण्याची काळजी
• गाई-म्हशींच्या शेणात कधी कधी प्लास्टिकच्या बाटल्या, इंजेक्शन सिरींज, लसीकरणाचे टाकाऊ पदार्थ, काच, प्लास्टिकचे हातमोजे यांसारखे अपशिष्ट असू शकतात.
• तेव्हा हे घटक शेतात पसरू नये म्हणून शेण शेतात टाकण्यापूर्वी त्यातील हानिकारक वस्तू निवडून बाजूला काढाव्यात.
अर्धवट कुजलेले शेणखत टाळावे
• अर्धवट कुजलेले शेणखत जमिनीत टाकल्यास उष्णता निर्माण होते ज्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडुळे नष्ट होऊ शकतात.
• त्यामुळे शेणखत चांगले कुजवून मग वापरावे.
कंपोस्टिंग पद्धतीने शेणखत तयार करणे
• गोठ्यातील शेण, शेतातील कचरा आणि काडी-कचरा यांचा वापर करून दर्जेदार कंपोस्टिंग करा.
• जर कंपोस्टिंग शक्य नसेल, तर शेण मोकळ्या जागेत पाणी टाकून कंपोस्ट कल्चर लावून चांगले कुजवावे.
फळबागेत शेणखत वापरणे
• फळबागेत शेणखत वापरताना खड्डा खणून त्यात शेणखत टाकावे आणि मातीने बुजावे.
• मातीच्या संपर्काने सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
• शक्य असल्यास अशा शेणखतापासून गांडूळ खत तयार करून वापरल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.
शेळ्या-मेंढ्यांचे लेंडी खत वापरताना सावधगिरी
• शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडी खतात बाभळीच्या बिया असू शकतात.
• शेळ्या-मेंढ्या बाभळीच्या शेंगा खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया पसरतात.
• अशा खतामुळे शेतात बाभळीचे झाडे पाच- सहा वर्षे उगवत राहतात. त्यामुळे याचा वापर करताना काळजी घ्यावी.
वरील विविध माहितीचा योग्य उपयोग करून शेणखताचा योग्य वापर केल्यास शेताची उत्पादनक्षमता वाढते आणि जमिनीत पोषणतत्त्वे सुधारतात.
हेही वाचा : सेंद्रिय खतांसह प्रभावी सिंचनाने केला कायापलाट; २५ गुंठे हळदीचे झाले ३५ लाख उत्पन्न