मोठ्या प्रमाणावर साठवलेल्या धान्याचे किडींमुळे नुकसान होते. साठविलेल्या धान्याचे प्रमुख शत्रू म्हणजे धान्यातील विविध किडी, कोळी त्याचबरोबर उंदीर व पक्षी होत. धान्य साठवणूकीत होणाऱ्या नुकसानापैकी मुख्य नुकसान किडी व उंदरांमुळे होते.
किडींच्या प्रादुर्भावाची सुरुवात कणसावर किडींनी दिलेल्या अंड्यापासून, खळ्यापासून, साठविलेल्या जून्या धान्यांपासून, वाहनाद्वारे आणि पोत्यातून होते. यामध्ये प्रामुख्याने भुंगेवर्गीय व पतंगवर्गीय किडींचा समावेश होतो.
नियंत्रणाचे उपायधान्य आणि बियाणे सुरक्षित साठविण्यासाठी खालील पाच सूत्रांचा अवलंब करावा.१) बियाणे/धान्य उन्हामध्ये वाळवून (ओलावा ८ टक्के पेक्षा कमी) ते हवेशीर साठवावे.२) धान्य आणि बियाणे साठविण्यासाठी बांबू किंवा पॉलिथिनच्या तळवटाचा वापर करावा.३) धान्य आणि बियाणे साठविण्यासाठी आधुनिक हवाबंद कोठ्यांचा वापर करावा.४) कीड नियंत्रणासाठी धुरीजन्य किटकनाशकांचा वापर करावा.५) शेतातील उंदरांच्या बंदोबस्तासाठी विषारी आमिषाचा वापर करावा. याकरिता ३८० ग्रॅम भरडलेले गहू/ज्वारी/मका धान्य + १० मि. ली. गोडेतेल (शेंगदाणा किंवा जवस तेल) + १० ग्रॅम झिंक फॉस्फाइड ८०% पावडर मडक्यात घालून काडीने चांगले ढवळावे आणि अशा विषारी आमिषाच्या लहान लहान प्रत्येकी १० ग्रॅमच्या गोळ्या तयार कराव्यात. त्या प्लॅस्टीकच्या पिशवीत भरून त्या सीलबंद करून एक प्लॅस्टिकची १० ग्रॅमची आमिषाची पिशवी एका बिळात ठेवावी. शेतामध्ये साधारणतः १० ग्रॅम झिंक फॉस्फाइड पावडरपासून बनविलेले आमिष ४० बिळांना पुरेसे आहे.
प्रतिबंधात्मक उपाय■ बियाणे/धान्य मळणी करण्यासाठीचे खळे कोठारपासून लांब अंतरावर असावे.■ बियाणे/धान्य साठवणूकीपूर्वी कडक उन्हात वाळवावे.■ बियाणे/धान्यसाठविण्यापूर्वी रिकामी पोती, कणग्या, साठविण्याची जागा व्यवस्थित साफ करून कीडविरहित करावी.■ साठवणुकीच्या जागेतील भिंतीची छिद्रे व भेगा सीमेंट च्या सहाय्याने बुजवून घ्याव्यात.■ साठवणूकीच्या जागेतील उंदराची बिळे सिमेंटच्या सहाय्याने बुजवून घ्यावीत.■ खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या लावाव्यात.■ बियाणे/धान्य साठविण्यासाठी शक्यतो नवीन गोण्या/पोते वापरावे.■ गोण्या/पोते गरम पाण्यात ५० अंश से. तापमानपेक्षा अधिक १५ मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावेत.■ उघड्या धान्यावर कीटकनाशकाची फवारणी करू नये.■ धान्याची पोते लाकडी फळ्या किंवा बांबूच्या काठ्यावर भिंतीपासून ३ फुट लांब अंतरावर ठेवावेत.■ साठवणूकीच्या जागेतील परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. पावसाळ्यात बियाणे हवाबंद ठिकाणी ठेवावे.■ उन्हाळ्यात बियाणे मोकळी हवा मिळेल असे ठेवावे. पावसाचे पाणी साठवणुकीच्या जागेमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी.■ कडूनिंबाचा पाला, बियांची पावडर आणि तेल इ. उपयोग किडींना प्रतिबंधात्मक आणि खाण्यास विरोध करणारा आहे.■ कडधान्यातील भुंगेऱ्याच्या नियंत्रणासाठी निंबोळीची पावडर ५ टक्के बिजप्रक्रियेसाठी उपयुक्त आहे.■ सोंडे या किडीसाठी हळदीची पावडर किंवा वेखंड पावडर १० ग्रॅम प्रती किलो बियाणे प्रक्रिया फायदेशीर ठरते.■ बियाणे/धान्य साठवणुकीस उत्तम पर्याय म्हणजे धातूच्या पत्र्याच्या कोठ्यांचा वापर करणे हा आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या बांधावर ह्या बहुपयोगी वनस्पतीचे एक तरी झाड असायला हवं