हरभरा हेपीक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात घेतले जाते. राज्याचे कडधान्याचे क्षेत्र ४३.९९ लक्ष हेक्टर असून, उत्पादन ४१.२३ लक्ष टन व उत्पादकता ९३७ किलो प्रति हेक्टर एवढी आहे
हरभरा हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जीवाणूमार्फत हवेतील १२०-१३० किलो नत्र/हेक्टरी शोषून त्याचे मुळावरील ग्रंथीमध्ये स्थिरीकरण केले जाते यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. तसेच जमिनीची सुपीकता वाढते.
बीजप्रक्रिया Bij Prakriya कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जिवाणूंपासून पिकाचे संरक्षण होते.
बीजप्रक्रिया
१) मर, मूळकूज किंवा मानकूज या रोगांपासून नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी अथवा कार्बेन्डॅझिम २५% + मॅन्कोझेब ५०% डब्लूएस या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम/किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२) पेरणीपूर्व २-५ किलो/एकर ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात किंवा गांडूळखतामध्ये मिसळून जमिनीत टाकावी.
जिवाणू संवर्धके वापरण्याची पद्धत
१) रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारी जीवाणू संवर्धके प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावी.
२) प्रथम १२५ ग्रॅम गूळ प्रति लिटर गरम पाण्यात विरघळून घ्यावा. थंड द्रावणात २५० ग्रॅम प्रत्येक जिवाणू संवर्धन एकत्र करावे. १० किलो बियाण्यास हे मिश्रण पुरेसे आहे.
३) बियाणे ताडपत्री, फरशी किंवा प्लॅस्टिकवर घेऊन संपूर्ण बियाण्यावर आवरण होईल याप्रमाणे मिसळावे.
४) असे बियाणे सावलीत वाळवावे व त्यानंतर पेरणीसाठी वापरावे.
५) यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो.