बदलत्या हवामानात जमीनीचा कस कमी होत असताना पीक उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होतो. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनी क्षारपड होत असून जगभरात कंपोस्ट खत बनवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. केवळ शेतातच नाही तर सोसायटी किंवा घरातही कंपोस्ट खत बनवता येते.
कंपोस्ट म्हणजे काय?
शेतातील काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे अवशेष, बांधावरील पानगळ, उरलेले अन्न, पालापाचोळा याला कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत. जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी हे खत उपयुक्त ठरते. हे खत माती आणि वनस्पतींसाठी अत्यंत उपयोगी आहे.
कोणकोणत्या पद्धती आहेत कंपोस्ट बनवण्याच्या जाणून घेऊया...
१. ओपन एअर कंपोस्टिंग
२. डायरेक्ट कंपोस्टिंग
३.टंबलर कंपोस्टिंग
४.वर्म फार्म कंपोस्टिंग
५. EMO कंपोस्टिंग
१. ओपन एअर कंपोस्टिंग
हे कंपोस्ट खत तुमच्या घरामागील अंगणातही बनवता येऊ शकते. याता हिरव्या आणि तपकिरी सामग्रीचे ढीग म्हणजे झाडाची पाने, लाकडाचा भूसा,पालापाचोळा, माती, एकत्र करून हे खत तयार होते. आपण पाणी आणि उष्णतेची पातळी नीट ठेवण्यासाठी विविध कंटेनरमध्येही हे खत ठेऊ शकता
२.डायरेक्ट कंपोस्टिंग
यामध्ये खड्डा खणून उरलेले अन्न, अंड्याची टरफले, भाजीपाला, स्वयंपाकघरातील कचरा, भाज्यांची देठे मातीत पुरली जातात. हे खत थोडे उशीरा तयार होते. पण हे तेवढेच प्रभावी आहे.
३.टंबलर कंपोस्टिंग
हे कंपोस्टिंग विविध आकारात येते. घरगुती किंवा व्यावसायिक अशा दोन्हींसाठी हे कंपोस्ट असून काहींना हे सोपे वाटते पण जेष्ठांना यात सामग्री टाकण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
४. वर्म फार्म कंपोस्टिंग
कंपोस्ट करण्यासाठी हे सर्वात चांगले खत आहे. गांडूळ खतामुळे मातीतील जिवाणू वाढतात जे मातीच्या आरोग्यासाठी किंबहूना पिकांच्या वाढीसाठी चांगले असतात. यासाठी चहाचा गाळ, माती, भूसा अशा अनेक पदार्थांना मिसळून उन्हापासून लांब ठेवले जाते. ज्यामुळे यात गांडूळे तयार होतात.
५. EMO कंपोस्टिंग
इनडोअर वापरासाठी हे कंपोस्ट सर्वोत्तम मानले जाते. हे लहान जागेतही करता येत असल्याने गार्डनमधील किंवा परसबागेतील झाडांनाही तुम्हाला वापरता येऊ शकते.