मिशन २०० अंतर्गत बीड जिल्ह्यातील २०० सिंचन प्रकल्पातील गाळ काढावा, तो गाळ शेतकऱ्यांनी शेतात न्यावा यासाठी सर्व कामांचे आराखडे तत्काळ तयार करून युद्ध पातळीवर सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी संबंधित विभागांना मंगळवारी दिल्या.जिल्ह्यात मिशन २०० मोहीम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणी व प्रगतीबाबत बैठक घेतली. सदरील बैठकीसाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तलावातील गाळ काढल्याने मूळ संकल्पित पाणीसाठा पुनर्स्थापित होण्याबरोबरच सदरील गाळ शेतात पसरविल्याने शेतजमिनीस नवसंजीवनी प्राप्त होईल.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व शेतकरी सहभागातून गाळ काढून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेऊन टाकावा. त्यासाठी शासनाकडून यंत्रसामग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येणार आहे. तसेच, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी ३५.७५ घन मीटर प्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान निश्चित करण्यात आले आहे.त्यासाठी नोंदणी व कामाची प्रक्रिया स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येईल. तंत्रज्ञानाचा वापर करत यासाठी अवणी अॅप तयार केले आहे. योजनेंतर्गत शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी होऊन गाळ घेऊन जावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मुधोळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वयंसेवी संस्था किंवा शेतकरी यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कार्यालयाशी संर्पक साधावा, असेही त्यांनी सांगितले.
धरण, तलावातला गाळ शेतात नेऊन टाका; यंत्र, इंधनाचा खर्च शासन देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 2:57 PM