ड्रोनच्या साह्याने सध्या नॅनो युरिया सारखे विद्राव्य खत आणि किटकनाशकांची फवारणी करता येत असून अनेक ठिकाणी शेतकरी फवारणीसाठी ड्रोनचा वापर करत आहेत. मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा पाचशे रुपये तास असे भाडे देऊन आपल्या कपाशीवर ड्रोनद्वारे फवारणी करून घेतली होती. भविष्यात शेतीसाठी ड्रोनचा वापर वाढत जाणार आहे.
ड्रोनचा वापर करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. केवळ फवारणीच नव्हे, तर भात लागवडीसाठीही ड्रोन आता उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पेरणीसाठी ड्रोनचा वापर होऊ शकतो. तेलंगाणा राज्यातील प्रोफेसर जयशंकर तेलंगाणा राज्य कृषी विद्यापीठाच्या साह्याने भात लागवड करणारे ड्रोन एका खासगी कंपनीने विकसित केले असून त्याचे पेटंटही घेण्यात आले आहे. अशा प्रकारचे पेरणी किंवा लागवडीसाठी विकसित होणारे हे पहिलेच ड्रोन असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीएसआर प्रकारच्या ड्रोनच्या वापरामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना खूप फायदे होणार असल्याचे सांगितले जात आहे. या ड्रोनमुळे पाण्याची बचत, वेळेची बचत, तसेच मजुरांची संख्या कमी लागणार असल्याने मजूर समस्येवरही उपाय म्हणून त्याचा वापर होऊ शकेल. दरम्यान तेलंगाणा येथे विकसित झालेला हा ड्रोन वापरल्यास भाताच्या लागवडीखालील क्षेत्र वधारण्यास उपयोग होईल असे त्याच्या निर्मिती आणि संशोधन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर हा ड्रोन पेरणीसोबतच कीटकनाशक फवारणी, खत फवारणीही करू शकणार आहे. त्यामुळे एका ड्रोनच्या माध्यमातून अनेक उपयोग शेतकरी करू शकतील.