विकास शहाशिराळा तालुक्यात भात हे मुख्य पीक याचबरोबर सोयाबीन, शाळू, गहू आदी पिके घेतली जातात. पूर्वी शेतातील पिकापासून धान्याची रास करण्यासाठी शेतकरी शेतात खळे करत असे. मात्र, यांत्रिकीकरणामुळे काळाच्या ओघात हे खळे गायब झाले आहे. त्याची जागा मळणी यंत्राने घेतली आहे. याशिवाय लोखंडी कॉटवर काढलेले पीक आपटून रास तयार केली जाते.
खळ्यावर मळणी कशी केली जायची?जुन्या काळी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात गोल आकारात खळे करीत असे. यासाठी मध्यभागी एक भक्कम लाकूड रोवले जात असे. त्या भोवतालची गोलाकार जमीन लाकडी चोपणीने चोपून गुळगुळीत केली जात असे. नंतर शेणाने सारवून घेत, धान्य मळणीसाठी या खळ्याची निर्मिती करीत असे. या खळ्यात खुडलेले, कापलेले भात, बाजरी व ज्वारी आदी पीक पसरले जायचे. मध्यभागी रोवलेल्या लाकडाभोवती बैल बांधले जायचे. त्यांनी धान्यात तोंड घालू नये, म्हणून त्यांच्या मुसक्या बांधल्या जात असत. हे बैल खळ्यातील कणसावर गोलाकार फिरत. त्यांच्या फिरण्याने कणसांमधून दाणे वेगळे होत व नंतर वाऱ्याच्या वेगानुसार उंचावर उभे राहत धान्य उफणले जायचे. यात त्यातील फोलपटे, कचरा आणि निरुपयोगी हलका भाग वाऱ्यामुळे पुढे जायचा व धान्य खाली साठून राहायचे. थोडक्यात, खळे म्हणजे जुन्या काळचे मळणी यंत्रच होते.
परंतु आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतातच प्लास्टीक कागदावर धान्य काढणीचे मळणी यंत्र आणून तासाभरातच सोयाबीन, भात, ज्वारी, गहू, बाजरी तयार केली जाते किंवा लोखंडी कॉटवर भाताचे पीक आपटून रास तयार केली जाते.