Join us

थंडीमुळे आंबा पिकाला येतोय पुनर्मोहर; कसे कराल व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 3:49 PM

हापूस आंब्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यावर मोहर येण्यास सुरुवात होते व अशा मोहरावर फळधारणा होते. मात्र, जानेवारी ते मार्च महिन्यात अचानक सात ते दहा दिवस थंडीची लाट येते. अशा वेळेस जुन्या फांद्यांवर, तसेच फळे धरलेल्या फांद्यावर तेथेच पुन्हा नवीन मोहर येतो.

हापूस आंब्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यावर मोहर येण्यास सुरुवात होते व अशा मोहरावर फळधारणा होते. मात्र, जानेवारी ते मार्च महिन्यात अचानक सात ते दहा दिवस थंडीची लाट येते. अशा वेळेस जुन्या फांद्यांवर, तसेच फळे धरलेल्या फांद्यावर तेथेच पुन्हा नवीन मोहर येतो. त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहराकडे होऊन जुन्या मोहराला असलेली वाटाणा/गोटी आकाराची फळे गळून पडतात. ही समस्या हापूस या जातींमध्ये जास्त प्रमाणात (२० टक्के) आढळते.

जिब्रेलिक अॅसिड हे मोहर येण्यामध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे जिब्रेलिक अॅसिड वेगवेगळ्या प्रमाणात व वेगवेगळ्या वेळी वापरावे. जिब्रेलिक अॅसिड ५० पी.पी.एम. ची १ ग्रॅम २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे नवीन मोहर येण्याची प्रक्रिया थांबते. जिब्रेलिक अॅसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथमतः ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावी. हापूस आंब्यामध्ये फळधारणा ही झाडाच्या बाहेरील बाजूने खालील व मधल्या भागात जास्त आढळते. झाडाच्या टोकाकडील (शेंडा) भागात जास्त पालवी, फांद्या असल्यास झाडाच्या आतील बाजूस सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे नवीन पालवी व फळधारणा होत नाही.

झाडांची मध्य फांदी छाटणी व काही घन फांद्या विरळणी केल्याने झाडाच्या आतमध्ये सूर्यप्रकाश पोहोचतो, पालवी येते व फलधारणा होते, फळांना चांगला रंग येतो, उत्पादनात वाढ होते. झाडावर आतून व बाहेरून फळधारणा झाल्याने उत्पन्न वाढते. याशिवाय मध्य फांदीची छाटणी व इतर फांद्यांची विरळणी केल्यामुळे झाडाच्या आतील भागात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिल्याने तुडतुडे, इतर कीटक व बुरशीचे प्रमाण कमी होऊन फळांची प्रत सुधारते.

अधिक वाचा: वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण

कोकणातील जांभ्या जमिनीत अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी खतांच्या शिफारशींचा अवलंब करून हापूस आंब्याच्या फळांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी ०.५ टक्के (युरिया, एस.ओ.पी प्रत्येकी) आणि ०.२५ टक्के सोडियम मॉलिब्डेट अशी अन्नद्रव्ये असणाऱ्या द्रावणाच्या तीन फवारण्या कराव्यात. काडीची शाखीय वाढ आढळून आल्यानंतर बहरलेल्या मोहरावर आणि फळ अंड्याएवढे असताना करावी.

फळगळ कमी करावीफळधारणा झाल्यावर जेथे उपलब्ध व शक्य आहे तेथे प्रति झाडास १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. अशा प्रकारे ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र, फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे. म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. पाऊस संपल्यावर झाडांना मोहर येईपर्यंत पाणी देऊ नये. अन्यथा मोहराऐवजी पालवी अधिक येऊन उत्पादन कमी मिळण्याची अधिक शक्यता असते. आंबा काढणीनंतर फळकूज रोगाचे प्रभावी नियंत्रण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :आंबाफलोत्पादनशेतकरीकीड व रोग नियंत्रणफळेशेती