जवस हे रब्बी हंगामातील (Rabi Season) महत्त्वाचे तेलबिया पीक (Oil seed crop)आहे. त्याचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी (Thread Production) केला जातो.
जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी २०% खाद्यतेल म्हणून, तर ८०% तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेंड, व्हॉर्निस, शाई तयार करण्यासाठी वापर होतो. जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक आहे.
तर जवसाच्या कड्यापासून तयार होणाऱ्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे त्याचा पिशव्या, कागद व कपडे तयार करता येतात. याच अनुषंगाने जाणून घेऊया जवस लागवड माहिती.
जवस लागवडी योग्य जमीन : जवस पिकासाठी मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. तिचा सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) ५ ते ७ दरम्यान असावा.
हवामान : या पिकाच्या वाढीसाठी २० ते ३० अंश से. तापमान आवश्यक असते. या पिकास फुलोरा व त्यानंतरच्या अवस्थेत जास्त कोरडे व उच्च तापमान (३२ अंश से.) असल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट संभवते.
पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी द्यावी, काडीकचरा वेचून घ्यावा. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरून मिसळावे.
पेरणीची वेळ व लागवडीचे अंतर : पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधवड्यात करावी. दोन ओळींतील ३० सेंमी किंवा ४५ से.मी. अंतर ठेवावे. तर दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. ठेवावे. पेरणी ५ ते ७ सेंमीपेक्षा अधिक खोल करू नये.
बियाण्याचे प्रमाण : अधिक उत्पादनासाठी रोपांची संख्या प्रति हेक्टरी ४.५ ते ५ लाख असावी. त्यासाठी शिफारस केलेले शुद्ध प्रमाणित, टपोरे व निरोगी बियाणे प्रति हेक्टरी ८ ते १० किलो प्रति हेक्टरी वापरावे.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम किंवा थायरम ३ ते ३.५ ग्रॅम लावावे.
खत व्यवस्थापन : कोरडवाहू पिकासाठी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद संपूर्ण खत प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे. तर बागायती लागवडीसाठी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र (३० किलो) + संपूर्ण स्फुरद (३० किलो) पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरीत अर्धी नत्र मात्रा (३० किलो नत्र) पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन : या पिकास दोनदा पाणी देणे आवश्यक आहे. पहिले पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच ४० ते ४५ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी (बोंडे धरण्याच्या वेळेस) द्यावे.
आंतरमशागत : जवसाचे पीक पहिल्या ३५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली डवरणी करावी.
काढणी व मळणी : पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या रंगाची झाल्यावर जवस पीक काढणीस योग्य असे समजावे. त्यानंतरच विळ्याच्या साह्याने काढणी करावी. त्यानंतर ४ ते ५ दिवस सूर्यप्रकाशात वाळवून नंतर मळणी करावी. उत्पादित बियाणे स्वच्छ करून वाळवावे.
महत्वाचे : बियाण्यामध्ये ओलावा १० टक्क्यांपर्यंत आल्यास वाळविणे थांबवावे. निर्जंतुक केलेल्या पोत्यात भरून कोरड्या हवेत त्याची साठवणूक करावी.
प्रा .संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर
मो. नं. ७८८८२९७८५९
हेही वाचा - Weed Management गाजरगवत नियंत्रणाच्या काही सोप्या पद्धती