सामुच्या मूल्याचा जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होते, बहुतांशी पिकांना लागणारे अन्नद्रव्ये (प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये) हि सामू ६.६ ते ७.३ या तटस्थ (उदासीन) या वर्गवारीत उपलब्ध होतात तरीपण बदलत्या हवामान परिस्थितीत सामू ६ ते ८ पर्यंतच असावा तसेच सामू वरून जमिनी आम्लयुक्त आहेत का विम्लयुक्त आहे हे कळते. परंतु अति आम्ल किंवा अति विम्ल प्रमाण असल्यास रासायनिक भूसुधारके (उदा. आम्ल जमिनीत लाईम तसेच अति विम्ल जमिनीत जिप्सम/गंधक) सुधारणा करण्यासाठी किती टाकावे हे कळते व त्याद्वारे या जमिनीची भूसुधारणा करता येते.
अ) मुलद्रव्यांचा पुरवठा आणि पिकांचे उत्पादनजमिनीच्या सामूवरून त्या जमिनी कोणत्या परिस्थितीत तयार झाल्या आहेत याची स्थूल मानाने कल्पना येते. सर्वसाधारणपणे जास्त पावसाळी परंतु उष्ण प्रदेशात आम्ल जमिनी व कमी पावसाळी परंतु उष्ण प्रदेशात विम्ल जमिनी आढळतात. त्यावरून सामूच्या प्रमाणात पिकांच्या वाढीवर आणि त्यांना उपलब्ध होणाऱ्या मूलद्रव्यांवर परिणाम होतो. काही मुलद्रव्ये विशेष स्थितीतच उपलब्ध होतात. जमिनीच्या आम्ल विम्ल व उदासिनतेप्रमाणे पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते.
सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असल्यास बहुतेक पिकांना पोषकद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात. ती जमीन उपजावू असते. त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येते. जमीन आम्लयुक्त असल्यास चहा, कॉफी, बटाटा आणि विम्लयुक्त असल्यास खजूर, बीट, कांदा, ऊस इत्यादी पिके चांगली वाढतात. त्याचप्रमाणे ती साधारण आम्ल किंवा विम्ल असल्यास सोयाबीन, टोमॅटो, गाजर, कोबी, वाटाणा, चवळी, तंबाखू इत्यादी पिके चांगली वाढतात.
ब) जमिनीचे फूल आणि घडणजमिनीचे फूल आणि घडण चांगली टिकविण्यासाठी जमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत राखणे महत्वाचे आहे. बेसाल्ट ट्रॅप खडकापासून तयार झालेल्या जमिनीचा सामू ७ ते ८.५ पर्यंत असतो. पंरतू तो ८.५ या पुढे गेल्यास जमीन चोपण बनते आणि ढेकूळ टणक होऊन जमिनीचे फुल बिघडते. पाण्याची निचरा क्षमता (ड्रेनेज कॅपसिटी) कमी होऊन सोडियम क्षारांचे प्रमाण वाढते. जमिनीचा सामू ६ ते ८ दरम्यान राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, निचऱ्याची व्यवस्था, आम्लधर्मीय रासायनिक खतांचा वापर, पिकांचे गरजेनुसार पाणी व्यवस्थापन, फेरपालटीची पिके, हिरवळीच्या खतांचा वापर व पीक पध्दतीचा अवलंब करणे अत्यंत महत्वाचे आहे.
क) जीवजंतूची वाढउपयुक्त अशा सुक्ष्म जीवांची वाढ सामूवर अवलंबून असते. उदासीन ते थोड्याशा विम्ल असलेल्या जमिनीत जिवाणूंची वाढ चांगली होते. अती आम्ल जमिनीत अॅझोटोबॅक्टर जीवाणू आणि गांडूळ यांची वाढ होत नाही. परंतु बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आम्लयुक्त जमिनीत नत्रयुक्त सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर उपलब्ध नत्रामध्ये होण्यास विलंब लागतो. तसेच अती विम्ल जमिनीत सुध्दा अशीच परिस्थिती दिसून येते. हवेतून नत्र घेऊन पिकास सहयोगी पद्धतीने उपलब्ध करून देणारे रायझोबीयम जीवाणू हे देखील जमिनीचा सामू ६.० से ६.३ असलेल्या जमिनीत अधिक प्रमाणात दिसून येतात.
ड) खतांचा वापरआम्ल जमिनीत सुपर फॉस्फेटमधील स्फुरदाची उपलब्धता कमी होते, म्हणून खत देतांना सुपर फॉस्फेटचे प्रमाण वाढवावे लागते. विम्लयुक्त आणि चुनखडीयुक्त जमिनीत स्फुरद, पालाश, जस्त, लोह आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता कमी होते म्हणून अशी अन्नद्रव्ये असलेली खते जास्त प्रमाणात टाकावी लागतात, जमीन आम्लयुक्त असल्यास स्फुरद, लोह अथवा अॅल्युमिनीयमने घट्ट धरून ठेवला जातो तर विम्लयुक्त चुनखडीच्या जमिनीत तो कॅल्शियमद्वारे घट्ट धरून ठेवला जातो. त्यामुळे पिकांना तो सहज उपलब्ध होत नाही. यालाच स्फुरद स्थिरीकरण म्हणतात. जमिनीत हे कमीत कमी व्हावे म्हणून स्फुरदयुक्त खते ओळीतूनच द्यावीत. अती आम्ल जमिनीमध्ये लोह, अॅल्युमिनीयम, तांबे इत्यांदीचे प्रमाण जास्त दिसून येते. त्यामुळे पिकास उपयोग होण्याऐवजी अपाय होण्याचा संभव असतो.
अधिक वाचा: मातीचा सामू कसा मोजला जातो?
इ) पिकांवरील रोगजास्त आम्ल जमिनीत केळीचा पनामा रोग, जास्त विम्ल जमिनीत बटाटयाचा बांगडी रोग व उसावरील केवडा रोग दिसून येतो. जास्त आम्ल जमिनीत आम्लामुळे व जास्त विम्ल जमिनीत विम्लामुळे मातीची घडण बिघडून जास्त टणक होवून पिकांच्या मुळांवर व त्यांच्या पेशींवर विपरीत परिणाम होतो व परिणामी ती निकृष्ठ बनतात. उगवलेली रोपे सुकून अथवा जळून जातात. काही वेळा बियाणे न रूजता मरून जाते. अती आम्ल अथवा विम्लपणाचे पिकाच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतात.
मातीच्या विद्रावातील जमिनीच्या सामूचे मुल्य बदलण्यास प्रतिकार करण्याच्या क्षमतेला जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता असे म्हणतात. जमिनीची प्रतिरोधक शक्ती जास्त असल्यास जमिनीच्या सामूमध्ये बदल होण्यासाठी मोठ्याप्रमाणात भूसुधारके उदा. चुना, गंधक, जिप्सम टाकण्याची आवश्यकता असते, जमिनीमध्ये चिकणमाती, सेंद्रिय पदार्थ, कार्बोनेट व फॉस्फेटची संयुगे मातीचा सामू सहजासहजी बदलू देत नाहीत. जमिनीच्या प्रतिरोधक क्षमतेमुळे जमिनीच्या सामूचे स्थिरीकरण होते व त्यामुळे पिकांना ठराविक प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. तसेच बाहेरून घातलेल्या रासायनिक खतांमुळे सामूमध्ये सहसा विशेष बदल होत नाही.
सामुच्या व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात१) जास्त आम्ल जमिनीत सामू मुल्यानुसार चुना सेंद्रिय खताबरोबर मातीत मिसळावे तर जास्त विम्ल जमिनीत (चोपण) चुनखडीचे प्रमाण १०% पेक्षा कमी असल्यास जिप्सम तर चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास गंधक शेणखतात मिसळून शेतात टाकावे.२) शिफारसीनुसार प्रत्येक पिकांना शेणखत अथवा गांडूळखत किंवा कंपोस्ट खत पेरणी पूर्वी एक महिना अगोदर शेवटच्या कुळव्याच्या पाळीअगोदर जमिनीत मिसळावे.३) समस्यायुक्त जमिनीत जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर करावा उदा. चुनखडीच्या जमिनीत अमोनियम सल्फेट, डीएपी, सल्फेट ऑफ पोटाश यांचा वापर करावा तसेच सल्फेटयुक्त लोह, जस्त यांच्या माती परीक्षण करून कमतरतेनुसार शेणखतात मुरवून जमिनीतून द्यावे.४) सेंद्रिय भूसुधारके शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत, कोंबडीखत, स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (PROM) यांच्या वापर शिफारसीनुसार करावा.५) चुनखडीयुक्त जमिनीत जीवामृतची आळवणी करावी, द्रवरूप स्लरीचाही वापर आळवणीद्वारे जमिनीतून पिकांना केल्यास अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते.६) जैविक खतांचा बीजप्रक्रियाद्वारे किंवा समस्यायुक्त जमिनीत शेणखतातून मिसळून जास्त वापर करावा.
अशाप्रकारे वरीलप्रमाणे उपयायोजनाचे नियोजन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढेल व पर्यायाने हळूहळू जमिनीचा सामू तटस्थेकडे ठेवण्यास मदत होऊन सर्व पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकांचे शाश्वत उत्पादन घेता येईल.
मृद विज्ञानशास्त्र विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी