Join us

ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान

By रविंद्र जाधव | Published: June 23, 2024 3:36 PM

बीबीएफ पद्धत वापरल्याने अधिकाधिक फायद्याची शेती करणे झाले सोपे ..

सध्या शेती पीक पद्धतीत दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ज्यामुळे अधिकाधिक फायद्याची शेती करणे सोपे झाले आहे. मात्र या सर्वांचा वापर अध्याप काही अंशी सिमित असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या आधुनिक पद्धतींचा उपयोग करणे गजरेचे आहे. याकामी कृषि विभाग देखील वारंवार जनजागृती करून शेतकर्‍यांना जागरूक करत आहे. 

दरम्यान अलीकडे बी.बी. एफ. हे एक नवीन तंत्रज्ञान शेती लागवड पद्धती करिता विकसित झाले असून याचे शेतकरी बांधवांना अनेक फायदे होत आहे. सध्या सोशल मीडियावर या बीबीएफ पद्धत वापरुन लागवड झालेल्या शेताचा एक व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होत आहे. ज्यात असे दिसते की, बीबीएफ पद्धत वापरुन लागवड केल्याने शेतात पावसाचे पाणी न साचता ते शेताबाहेर निघाले आहे.

सोबतच शेजारी शेतात बीबीएफ चा वापर न केल्यामुळे पावसाचे पाणी शेतातच साचले गेले आहे. पावसाळ्यात पाणी न साचल्यामुळे पिकांची हानी होत नसल्याने बीबीएफ शेतकर्‍यांसाठी फायद्याचे ठरत आहे. 

बी.बी.एफ. पेरणी यंत्राचे विविध फायदे

• बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते.

• बी बी एफ पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दिर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. तसेच आंतरपिक पध्दतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते.

• पिकास मुबलक हवा सुर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक पिक किड रोगास बळी पडत नाही.

• बीबीएफ पध्दतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) २० ते २५% बचत होते.

• खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.

• उत्पन्नामध्ये २५ ते ३०% वाढ होते.

• वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यामान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते.

• जास्त पर्जन्यमान झाल्यास या पध्दतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.

• पिकामध्ये अंतर मशागत करणे उभ्या पिकांस सरी मधून फवारणी यंत्राव्दारे किटकनाशक फवारणे शक्य होते.

• या पध्दतीचा अवलंब केल्याने जमिनीची धुप कमी प्रमाणात होऊन सेंद्रीय कर्बाचा हास थांबल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते.

• या पध्दतीमुळे जमिनीची सच्छीद्रता वाढून जमिन भूसभुसीत होते. परिणामी पिकाची वाढ उत्तम होते.

बीबीएफ पद्धत वापरुन लागवड केल्यास कसा फायदा होतो त्याचा व्हिडिओ खालील लिंक वर क्लिक करून बघा.

 

टॅग्स :शेतीपीक व्यवस्थापनलागवड, मशागतपेरणीशेतकरीशेती क्षेत्रपाऊसतंत्रज्ञान