Join us

ह्या खताच्या अतिवापराने पिकात होऊ शकतो रोग, किडींचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:35 AM

युरिया Urea हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाईड नत्र असते. याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते.

युरिया Urea हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाईड नत्र असते. याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते. खत आम्लधर्मीय आहे. युरियामध्ये २०.६ टक्के ऑक्सिजन, २० टक्के कार्बन, ७ टक्के हायड्रोजन, १ ते १.५ टक्का बाययुरेट हे उपघटक असतात.

दमट हवामानात आर्द्रता शोधून घेतल्यामुळे खताचे खडे होतात. अन्य खतांत मिसळताना पाणी सुटणार नाही याची खात्री घ्यावी. नत्राचे अमाईड रूपांतर युरीयेज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नाइट्रेट स्वरूपात होते.

युरियाचा वापर आणि त्याचे परिणाम- केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते.रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते.- पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो.- युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.- पालाश, कॅल्शिअम, बोरॉन, तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते.- जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जिवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.- गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो.- युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (१० पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते.- पाण्यातील शेवाळ आणि पानवनस्पतींची वाढ होते.- विना निमकोटेड युरिया वापरल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो, त्यामुळे जमिनीतील पाणी दूषित होते या संपूर्ण प्रक्रियेद्वारे नायट्रस ऑक्साइड हा हरितगृह वायू तयार होतो. त्यामुळे वातावरणातील हवा दूषित होते.

युरियाचा अतिवापर नाही बरा- खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे. या अहवालानुसार खते द्यावीत.- नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा.- हिरवळीच्या खतांचा वापर करावा.- नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.- कालावधी कमी असल्याने नत्र खताची मात्रा विभागून द्यावी.- एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा.- युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर/ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. उसामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते.- भातामध्ये युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर करावा.- पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा.- कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.- ऊस, केळी, बीटी कापूस यांसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी.- नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी. चोपणयुक्त जमिनीत युरिया हे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबरच द्यावे. युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी.- राज्यातील ५२ टक्के जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे. अशा जमिनीत युरियाला पर्यायी अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यावर पिकांना नत्राबरोबर गंधक हे अतिरिक्त अन्नद्रव्य मिळून त्याचे चांगले परिणाम दिसतात.- युरिया फेकून किंवा पेरून देण्यापेक्षा पाण्यात मिसळून फवारणीद्वारे दिला तर अत्यंत कमी खतामध्ये चांगले परिणाम दिसतात.- युरियाला पर्याय म्हणून काही नत्रयुक्त विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहे, देशात उत्पादित होणारा आणि आयातीत युरिया सर्व उत्पादक व पुरवठादार यांना नीम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक आहे.

अधिक वाचा: Yellowish Soybean Treatment: सोयाबीनवरील पिवळेपणा घालवण्यासाठी करा हे सोपे उपाय

टॅग्स :खतेपीकशेतीकीड व रोग नियंत्रणशेतकरीसेंद्रिय खत