राज्यात सध्या अनेक भागात वळवाचा पाऊस झाला आहे. एकाबाजूला खरीपाची पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात असताना पांढऱ्या रंगाची हुमणी अळी डोके वर काढताना दिसून येत आहे. वळवाचा पाऊस पडल्याबरोबर हुमणी अळीचे भूंगे कोषातून बाहेर पडतात. ही अळी पिकांचे मुळ कुरतडून खाते. त्यामुळे झाड पिवळे पडते व नंतर वाळून जाते. जाणून घ्या हुमणी अळीमुळे होणारे नुकसान व व्यवस्थापन कसे करावे..
यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी परिपत्रक जाहीर केले आहे.
हुमणी ही एक बहुभक्षिक व खूप नुकसानकारक कीड आहे व या किडीला हुमणी, उन्नी, उकरी, गांढर, खतातील अळी, चाफर, भुंगेरे, इ. विविध नावाने ओळखले जाते. या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास हवामानातील बदल व एप्रिल-मे महिन्यात होणारा अवकाळी (वळवाचा) पाऊससुद्धा कारणीभूत असतो. या किडीतील अळी अवस्था पिकांना नुकसान करते. हुमणीची अळी अवस्था जुलै ते नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत असते व नंतर ही कोषावस्थेत जाते. म्हणून हुमणीच्या अळीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे
किडीची ओळख
या किडीचा प्रौढ भुंगा मजबूत बांध्याचा लालसर तपकिरी रंगाचा असतो. अळी पांढरी असून तिचे डोके गडद तपकिरी रंगाचे असते. तिला ३ पायाच्या जोड्या असतात. शेतात नांगरणी करताना किंवा शेणखताच्या खड्यात हमखास दिसणारी इंग्रजी सी (C) अळी म्हणजेच हुमणी होय. तर भुंगेरा गडद विटकरी अथवा काळपट रंगाचा असून, पंख जाड, तर पाय तांबूस रंगाचे असतात.
किडीचा जीवनक्रम
वळवाचा पाऊस पडल्याबरोबर हुमणी अळीचे भुंगे कोषांतून बाहेर पडतात व बाभूळ, कड़निव, बोर इ. झाडांवर त्यांचे मिलन होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लगतच्या शेतात९-१० सें. मी खोलीवर अंडे द्यायला सुरुवात करतात.
एक मादी ५० ते ७० अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसामध्ये ऊबतात व त्यातून अळी बाहेर पडते.
- अळी दोनदा कात टाकून ५ ते ९ महिन्यात पूर्ण वाढते व जमिनीत कोषावस्थेत जाते. या कोषांतून १४-२९ दिवसांनी प्रौढ भुंगे बाहेर येतात.
- हे प्रौढ जमिनीत सुप्तावस्थेत राहून मे-जून मधील पावसानंतर बाहेर पडतात. प्रौढ ४७-९० दिवसांपर्यंत जगतात.
नुकसानीचा प्रकार
अळी पिकांचे मुळे कुरतडून खाते. त्यामुळे झाड सुरुवातीला पिवळे पडते आणि नंतर वाळून जाते. अशी झाडे सहज उपटली जाऊ शकतात. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. एक चौरस अळी प्रती चौरस मीटर, एका झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे असणे ही या अळीची आर्थिक नुकसान पातळी असते. अशावेळी एकात्मिक व्यवस्थानाचे उपाय योजावेत.
एकात्मिक व्यवस्थापन
- पीक काढल्यानंतर खोल नांगरट करावी.
- कडूनिंब, बाभूळ, बोर इ. झाडावरील भुंगेरे रात्री ७ ते ९ वाजता काठीच्या सहाय्याने फांद्या हलवून खाली पाडून जमा करावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
- भुंगे गोळा करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिक रित्या प्रकाश सापळ्यांचा /पेट्रोमॅक्स बत्तीचा वापर करावा व सापळ्यातील भुंगे गोळा करून नष्ट करावेत. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रात पुरेसा होतो.
- जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी बुरशी मेटारायझियम अँनिसोपिली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा.
- निंदनी करताना अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
झाडावर सरासरी २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास मे-जून मध्ये क्लोरोपारिफॉस २०% प्रवाही २५ ते ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. यानंतर १५ दिवस जनावरांना झाडाचे पाने खाऊ देऊ नयेत.
- फोरेट १०% दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३ % दाणेदार २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत ओल असताना द्यावे.
- फिप्रोनील ४०% इमिडाक्लोप्रीड ४०% है संयुक्त कीटकनाशक ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ऊस पिकाच्या झाडाभोवती आळवणी करावी.
- सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या हुमणी किडीचे २-३ वर्ष एकात्मिक व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे.