बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन काजू पिकाची घटलेली उत्पादकता, त्यामुळे काजू बीचे गडगडलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजू बीसाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते.
यावर्षी ही योजना राबविण्याबाबत जिल्हा कृषी उत्पन्न समितीचा निर्णय अद्याप तळ्यात मळ्यात आहे. येत्या दोन दिवसात निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काजू उत्पादन शेतकऱ्यांनी कमी दरात काजू न विकता, बाजार समितीकडे काजू बी तारण ठेवून कर्ज घेता येते.
काजू बी नाशवंत नसल्यामुळे सुरक्षित राहते. सहा महिन्यात दर चांगला प्राप्त होताच काजू बी विकून बाजार समितीचे कर्ज परत फेडता येते. काजू बीसाठी शेतकऱ्यांना त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज देण्यात येते. शेतकऱ्यांना १८० दिवसांसाठी सहा टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता करून दिली जाते. दरवाढीनंतर विक्रीतून कर्ज रकमेची परतफेड करता येते.
शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणी असलेला सातबारा, आठ-अ, आधार कार्ड झेरॉक्स, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकची झेरॉक्स तसेच २०० रुपयांचा बॉण्डपेपर आवश्यक आहे. शेतमाल तारण योजनेंतर्गत एका शेतकऱ्याला काजू बीवर पाच लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची मर्यादा आहे. जास्त रकमेसाठी अवधी द्यावा लागणार आहे.
गेल्या चार वर्षात कर्ज वितरण
वर्ष | सहभागी शेतकरी | तारण ठेवलेला काजू (टनामध्ये) | कर्जाची रक्कम |
२०१८-१९ | १६ | ९०.०४ | ७६,१०,७५० |
२०१९-२० | १४ | ९०.२४ | ५०,५३,४४० |
२०२१-२२ | २३ | १८८.०६ | १,५१,६९,५३० |
२०२२-२३ | ११ | ६३.३० | ४८,१३,६०० |
काजू बीसाठी शेतमाल तारण योजना राबविण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. यावर्षी दीड कोटीचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्ष योजना राबविण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. - पांडुरंग कदम, सचिव, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी