सुधीर चेके-पाटील
पारंपरिक शेतीतून काहीच उत्पन्न हाती येत नसल्याने अनेक शेतकरी हताश होतात. अशा स्थितीत प्रयोगशील शेती करून समृद्ध होण्याचा मार्ग होतकरू शेतकऱ्यांना खुणावतो आहे. प्रामुख्याने विकतचे बीज घेऊन त्यातून केवळ शेतमालच न घेता भाजीपाला बीजोत्पादन आणि फळपिकातून बक्कळ कमाईची संधी शेतकऱ्यांना आहे.
अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. पिके चांगली आली तर बाजारात योग्य भाव मिळत नाही. प्रामुख्याने पारंपरिक शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यामुळे अडचणीत येतात. अशावेळी पारंपरिक शेतीला फाटा देत अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे तसेच आधुनिक शेती करून भाजीपाला बीजोत्पादनाचा प्रयोग केल्यास चांगले उत्पन्न मिळते.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाद्वारे विविध योजनाही राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून अनुदानही दिले जाते. सोबतच भाजीपाला बीजोत्पादनासारख्या प्रयोगासाठी थेट कंपन्यांशी करार होत असल्याने नुकसानीची शक्यताही अत्यल्प असते.विशेष बाब म्हणजे, भाजीपाला व इतर बीजोत्पादक शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या तुलनेत सुमारे ४० टक्के अधिक नफा मिळतो.
असा आहे उत्पादन खर्च, उत्पन्न व नफा
पीक | क्षेत्र (गुंठे) | बियाण्यांचे उत्पादन (किलो) | मिळणारा दर प्रती किलो (अंदाजे) | उत्पन्न (रुपये) | उत्पादन खर्च (रुपये) | निव्वळ नफा (रुपये) |
मिरची | १० | ४० ते ५० | ८००० | २२०००० | ८५००० | ८५००० |
ढोबली मिरची | १० | १२ | १२००० | २३०००० | १८०००० | ५०००० |
टोमॅटो | १० | २० | १२००० | २४०००० | ९५००० | १४५००० |
कारले | १० | ८० | १०००० | १५०००० | १२०००० | ७०००० |
टरबूज | १० | २० | १०००० | १२५००० | ६०००० | ६५००० |
खरबूज | १० | ३५ | ४००० | १४५००० | १००००० | ४५००० |
कांदा बियाणे | ४० | २.५ क्विं./एकर | ६०००० | १५०००० | ७०००० | ८०००० |
कापूस | २० | २५० | ३०० | ७५००० | ३५००० | ४५००० |
भेंडी | १० | १०० | ५०० | ५०००० | ३०००० | २०००० |
मका | ४० | २० | २५०० | ५०००० | १५००० | ३५००० |
बीजोत्पादनातून ४० टक्के निव्वळ नफा
बुलढाणा जिल्ह्यात एकूण ७ लाख ५० हजार ४५७ हेक्टर लागवडी क्षेत्र आहे. यापैकी केवळ ५६५.७९ हेक्टरवरच बीजोत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे, भाजीपाला व इतर बीजोत्पादनातून ४० टक्के निव्वळ नफ्याची हमी आहे. तथापि, जिल्ह्यात अत्यल्प क्षेत्रावर अशी प्रयोगशील शेती होत असल्याने यामध्ये खूप वाव आहे.
फळपिकांतून अधिक उत्पन्न
सोयाबीनचे पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न २ लाख ७० हजार आहे. याची संत्रा पिकासोबत तुलना केल्यास संत्र्याचे पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न हे ९ लाख रुपये आहे. कापसाच्या १ लाख ७२ हजारांच्या तुलनेत केळीचे सरासरी उत्पन्न ७ लाख ५० हजार आहे. सीताफळ २ लाख ५० हजार, आंबा १२ लाख, पेरु व लिंबू प्रत्येकी ३.६० लाख याप्रमाणे फळपिकांचे पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न असून फळपिकांचे सरासरी उत्पन्न हे पारंपरिक पिकांच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
सहा तालुक्यांतच बीजोत्पादन
बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या सहा तालुक्यांतच भाजीपाला बीजोत्पादन घेतले जाते. मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या सात तालुक्यांत भाजीपालावर्गीय बीजोत्पादन घेतले जात नाही.
बिजोत्पादनात दे. राजा आघाडीवर
बुलढाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मिरची, कांदा, टोमॅटो, काकडी, झेंडू, सिमला मिरची, कापूस, कारले, दोडका, वांगी, टरबूज या पिकांचे बिजोत्पादन केले जाते. त्यामध्ये भाजीपालावर्गीय आणि फळपीके मिळून देऊळगाव राजा तालुक्यात २५१.७७हेक्टरवर बिजोत्पादन घेण्यात आले. त्यानंतर सिंदखेड राजा तालुक्यात २३८.७४ हेक्टर, लोणार ६०.२१ हेक्टर, चिखली ७.७० हेक्टर, मेहकर ५.२७ तर बुलढाणा तालुक्यात २.१० हेक्टर बिजोत्पादन पीक घेण्यात आले.