Join us

शेतकऱ्यांनो दूध व्यवसाय करताय? बेबी कॉर्नची लागवड करा होतोय दुहेरी फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 12:15 PM

मानवी आहारात बेबी कॉर्नचा वापर केला जात असताना, कणसाची काढणी झाल्यानंतर मक्याची हिरवी ताटे दुभत्या जनावरांना चारा म्हणून घालता येतो. एकूणच दुहेरी फायदा होत असल्याने मका लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात मका लागवड करता येते.

मानवी आहारात बेबी कॉर्नचा वापर केला जात असताना, कणसाची काढणी झाल्यानंतर मक्याची हिरवी ताटे दुभत्या जनावरांना चारा म्हणून घालता येतो. एकूणच दुहेरी फायदा होत असल्याने मका लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात मका लागवड करता येते.

जमीन व पूर्वमशागतया पिकाला मध्यम ते भारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी उत्तम निचऱ्याची जमीन मानवते. एक खोल नांगरट करून फळी मारून जमीन भुसभुशीत व सपाट करून घ्यावी. पाणी देण्यासाठी योग्य आकाराचे वाफे व दोन वाफ्यांमध्ये पाट करावेत.

लागवडीचा कालावधीरब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर तर उन्हाळी हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पेरणी करावी, या पिकाची उशिरा किंवा लवकर पेरणी केल्यास उत्पन्नावर विशेष परिणाम होत नाही.

लागवडीसाठी वाणाची निवड व बीजप्रक्रिया७० ते ८५ दिवसात हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न देणाऱ्या जाती कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. जी-५४०६, माधुरी व मांजरी या सुधारित जाती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ४५ सेंटिमीटर बाय २० सेंटिमीटर अंतरावर मक्याची पेरणी करण्यासाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्व एका किलो बियाण्यास तीन ग्रॅम या प्रमाणात थायरम हे बुरशीनाशक लावावे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ

खत व्यवस्थापनजमिनीची मशागत करताना हेक्टरी १० टन सेंद्रिय खत द्यावे व ते मातीत शेवटच्या कुळवाच्या पाळीने चांगले मिसळून घ्यावे. या पिकाला हेक्टरी अनुक्रमे १००:५०:५० अशी नत्र स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी. यापैकी ४० किलो नत्र व संपूर्ण स्फूरद व पालाश पेरणीपूर्व द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी उर्वरित २० किलो नत्राची मात्रा पिकाला ओळीशेजारी लहान सरी काढून मातीने बुजवून द्यावी.

पाणी व्यवस्थापन व आंतरमशागतया पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने ६ ते ७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आवश्यकतेनुसार पेरणीनंतर दहा दिवसांनी नांगे भरून घ्यावे, पेरणीनंतर २० दिवसांनी एक कोळपणी, ४० दिवसांनी बेणणी करावी. तणनियंत्रणासाठी अॅट्राटाफ ४ ग्रॅम प्रती लीटर किंवा ऑक्झिडायरजिल लीटरला ०.२५ ग्रॅम या तणनाशकाचा वापर करावा. या पिकात दाणे भरू नयेत म्हणून परागीकरण टाळण्यासाठी मक्याचे तुरे येताच लगेचच कणसे काढावीत.

पीक संरक्षणकणसातील अळी, लष्करी अळी तसेच मावा या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस १.५ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. पानावरील करपा आणि तांबेरा या रोगांचा उपद्रव आढळल्यास नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ हे औषध ३ ग्रॅम प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारावे, पेरणीनंतर साधारणतः ७० दिवसांनी कणसावरील रेशमी तंतू बाहेर डोकावू लागल्यानंतर कणसांची काढणी करावी. रेशमी तंतू मुलायम असताना व ते सुकण्यापूर्वीच करावी म्हणजे उत्तम प्रतीचे बेबी कॉर्न मिळतात. कणसे काढल्यानंतर जनावरांना चारा मिळतो.

टॅग्स :मकादूधदुग्धव्यवसायअन्नपीकशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनव्यवसाय