शेतकरी पारंपरिक बियाणे जपायचे, ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण पारंपरिक बियाणे मौल्यवान आहे. 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक होत्या.
आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये, शेतकऱ्यांना पारंपरिक बियाणे गावातच मिळावे यासाठी पारंपरिक बियाणे जतन करणारी 'सीड बँक' तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
पिढ्यानपिढ्या जपलेल्या बियाणांच्या शोधात असताना माझी सहकारी तेजस्वी हिने, तिच्या आजीने जपलेले, आज तीन पिढ्या जुने झालेले वालाचे बियाणे आणून दिले. इतके जुने बियाणे जपलेले पाहून मला नवल वाटले.
गावातल्या जुन्या पिढीतील अनेक शेतकऱ्यांकडून आम्ही पारंपरिक बियाणे जपण्याच्या गोष्टी ऐकल्या. उन्हाळ्यात कडक उन्हातही शेतकऱ्यांची कामासाठीची लगबग सुरू असायची.
शेतामध्ये असलेला तीळ, मूग, मोहरी, वाल, चना, उडीद काढून, झोडून साफ करण्याची घाई सुरू असायची. साफ केलेले बियाणे शेतकरी काही प्रमाणात विकायचे, काही प्रमाणात कुटुंबासाठी ठेवायचे तर काही प्रमाणात पुढच्या वर्षी हे परत पेरण्यासाठी 'बियाणे' म्हणून जतन करायचे.
अनेक पिढ्यांपासून दरवर्षी जतन करून ठेवलेले 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक होत्या.
काही शेतकरी वेताच्या कणगीमध्ये खाली सागाची सुकलेली पाने टाकून त्यावर बियाणे ठेवून, कणगी शेणामातीने लिंपायचे. काही शेतकरी मातीच्या मडक्यामध्ये बियाणे ठेवून त्यात राख मिसळायचे. बियाणांना चीनी मातीच्या भरणीत भरायचे.
वाळवलेल्या कडुलिंबाच्या पाल्यात बियाणे ठेवायचे. तर काही चुलीच्या धुरामुळे बियाणे सुरक्षित राहील म्हणून चुलीवर शिंकाळे बांधून त्यात बियाणे ठेवलेले मातीचे मडके टांगून ठेवायचे. मुंग्या, टोके यांसारख्या किटकांपासून बियाणांचे संरक्षण करण्याचे हे प्रकार होते.
होळीनंतर उन्हात चांगली तापून निघालेली राख शेतकऱ्यांना बियाणे जपायला उपयोगी असायची. अशाप्रकारे रसायनांचा वापर न करता बियाणे साठवणे हा सेंद्रिय शेतीचा प्रकार होता.
शेतकरी पारंपरिक बियाणे जपायचे ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण पारंपरिक बियाणे मौल्यवान आहे. हे बियाणे पिढ्यानपिढ्या चालत आलेले असते. एका विशिष्ट भौगोलिक परिसरामध्ये वर्षानुवर्ष वापरल्या गेलेल्या बियाणांना त्या भौगोलिक वातावरणाची सवय झालेली असते.
त्यांची रुजवण क्षमता अधिक असते आणि त्या वातावरणामध्ये तग धरून राहण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण झालेली असते. हवामान बदलाशी सामना करण्यासाठी पारंपरिक बियाणे सक्षम असते.
या बियाणांना 'ओपन पॉलिनेटेड सीड' म्हणजे खुले परागीभवन होऊ शकणारे बियाणे म्हणतात. यांची रुजवण केल्यावर मिळणाऱ्या पिकातून पुन्हा रुजवण क्षमता असणारे बियाणे मिळते.
आज बरेचसे शेतकरी अधिक उत्पादनासाठी पारंपरिक बियाणे सोडून संकरीत बियाणे वापरतात. संकरीत बियाणांची रुजवण क्षमता कमी असते. अनेकदा त्यांच्या पिकातून पुन्हा 'बी' तयारच होत नाही.
पारंपरिक बियाणांचा वापर कमी झाल्याने आपण आपली 'बियाणे सुरक्षितता' गमावत आहोत. बियाणे सुरक्षेसाठी पारंपरिक बियाणे जतन केले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हे महत्त्व ओळखले होते. संत तुकाराम महाराजांच्या शब्दांत सांगायचे तर, "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी".
श्रुतिका शितोळे
पर्यावरण अभ्यासक
अधिक वाचा: नकोसा वाटणारा उन्हाळा ऋतू शेती, माती आणि एकूणच पर्यावरणासाठी का महत्वाचा? वाचा सविस्तर