ग्रामीण भागात गावोगावी कडूनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळ्या असून त्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करून पाच टक्के निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करता येऊ शकतो.
निंबोळी अर्क बनविण्याची साधी-सोपी पद्धत असून कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, जवस, भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या रस शोषण किडी, पतंगवर्गीय किडी, खोडमाशी, फळमाशी, भुंगा प्रजाती, कोळी किडीकरिता फवारणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
कडुनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध, किडीस खाद्यप्रतिबंधक, किड वाढ रोधक व किटकनाशक या विविध मार्गाने परिमाण साधतो. निंबोळी अर्काचा परभक्षी किंवा परोपजीवी मित्रकीटकांवर कोणताही अपायकरक परिणाम होत नाही.
पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत- उन्हाळ्यात (पावसाळ्याच्या सुरूवातीस) निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात.- साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात.- पाच किलो निंबोळी चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवावा.- तसेच एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.- दुसऱ्या दिवशी सकाळी ९ लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा.- गाळलेल्या अर्कात एक लिटर तयार केलेल्या साबणाचे द्रावण मिसळावे.- हे मिश्रण एकूण १०० लिटर होईल एवढे पाणी टाकावे. म्हणजे हा ५ टक्के अर्क फवारणीसाठी तयार होतो.- फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा.- उरलेला चोथा जमिनीमध्ये मिसळावा त्याचा खत म्हणून उपयोग होईल.
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक किटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत होईल त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून मित्रकिडींचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येईल. गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा.
अधिक वाचा: Seed Treatment खरीपातील कडधान्य तूर, मुग, उडीद पिकातील बीजप्रक्रिया कशी करावी?