कडूलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब.
मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे.
कडूलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.
कडूलिंबाविषयी थोडक्यात
वनस्पति नाव : अॅझारर्डिका इंडिका
कुटुंब : मेलेएसी
उष्ण कटीबंधीय भारतीय प्रदेश, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश येथे आढळणारा वृक्ष.
फुले फळे/बी : पांढरट रंगाची छोटी झुपक्यात येणारी लहान फुले (एप्रिल ते मे)
लहान आकाराच्या लिंबोळ्या बीया (मे ते जून)
उपयोग
- या झाडाची पाने, फळे, बीया, साल, मुळे सर्वच कडु असतात. याच्या अनेक उपयोगामुळे अनेकांचे आवडते झाड आहे.
- कडु असल्यामुळे "जंतुघ्न" हा त्याचा गुणधर्म पशुपक्षी, पीक मानव या सर्वांसाठी वापरला जातो.
- गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने खातात.
- कडुनिंबाच्या काडीने दंत मंजन केल्यास दात किडत नाहीत, दातांना बळकटी येते.
- मूळव्याध व पोटांतील कृमीवर उपयोगी.
पर्यावरणीय व शेतीतील महत्व
- जमिनीची धूप कमी करण्यासाठी तसेच वनीकरणासाठी कमी पाण्यावर वाढणारा उपयुक्त वृक्ष.
- पांढरट रंगाचे फुलांचे घोस, मधमाशांसाठी उपयुक्त.
- पडीक जमिनीत लावण्यास योग्य.
- बियांची उगवण क्षमता चांगली असल्यामुळे बी लवकर उगवते.
- शेळ्या व बकऱ्यांना पाला खाद्य म्हणून उपयुक्त.
- या झाडापासून भरपूर प्रमाणात आक्सिजन वायू मिळतो.
- कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही.
- कडूलिंबाचा अर्क (निंबोळी अर्क) किंवा तेल कीड नियंत्रणासाठी पिकांवर फवारले जाते.