नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषि अभ्यास दौरा, शेतकरी अभ्यास सहल व पर्यटनाला परदेशात जाणाऱ्या सातारकरांची संख्या अलिकडे वाढू लागली आहे. परदेशगमनाचे हे स्वप्न पासपोर्ट शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पासपोर्ट मिळत होता. मात्र, आता पंधराच दिवसांत तो मिळत असल्याने पासपोर्ट काढून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. राज्यातील अनेक कुटुंब आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवू लागले आहेत. काही जण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जात आहेत तर, काहीजण विदेश भ्रमंतीला पसंती देत आहे. मात्र, ज्या प्रमाणे आधारकार्ड हा आपला महत्त्वाचा दस्तऐवज आहे, त्याचप्रमाणे पासपोर्ट देखील महत्त्वाचा दस्तऐवज असून, तो असल्याशिवाय आपली परदेशवारी पूर्ण होऊच शकत नाही. मात्र, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही.
पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्टचे कार्यालय नव्हते. त्यामुळे नागरिकांना पासपोर्टसाठी महसूल मुख्यालयी जावे लागत असे, पण आता मात्र बऱ्यापैकी जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे विनाविलंब पासपोर्ट मिळत आहे. अशी पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यापासून नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हींची बचत झाली. शिवाय शासनानेही पासपोर्टची नियमावली बदलून नागरिकांना जलद पासपोर्ट देण्याचे नवीन धोरण हाती घेतले. आता अवघ्या पंधराच दिवसांत पासपोर्ट मिळत आहे.
कागदपत्रे काय लागतात?
पासपोर्ट काढण्यासाठी आधार कार्ड (इ साईन किंवा पीव्हीसी आधार कार्ड), बँक पासबुक, पॅनकार्ड, डायव्हिंग लायसन्स, जन्म पुरावा ही कागदपत्रे आवश्यक असून, अपॉईंटमेंटला जाताना सोबत शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे.
पासपोर्टसाठी खर्च किती?
साधारण: पासपोर्टसाठी अर्ज भरताना १ हजार ५०० रुपये शुल्क भरावे लागते. यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागते.
तत्काळ: पासपोर्ट तत्काळ हवा असेल तर नागरिकांना साडे तीन हजार रुपये शुल्क भरावे लागते. याची अपॉईंटमेंट पुणे किंवा सोलापूर येथे घ्यावी लागते.
ऑनलाइन अर्ज कोठे कराल?
पासपोर्टसाठी आपल्याला www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. येथे आपल्याला लॉग इन आयडी काढावा लागतो. अर्ज भरताना आधार नंबर, वोटिंग आयडी, मोबाइल क्रमांकास आपली इत्थंभूत माहिती भरावी लागते.