Join us

Shettale Yojana शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखाचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 2:43 PM

Shettale anudan राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्यामुळे Farm Pond शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होते.

राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होते. परिणामी त्यांना शेती व्यवसायातून चांगली कमाई करता येत आहे.

यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार असून तरुण शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जात आहे.

विहिरीसाठी आणि शेततळ्यासाठी देखील अनुदान मिळते. शेततळे खोदण्यासाठी कमाल ७५ हजार रुपये आणि अस्तरीकरणासाठी कमाल ७५ हजार असे एकूण दीड लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे. शेततळ्यासाठी दिले जाणारे हे अनुदान शेततळ्याच्या आकारमानानुसार मिळते.

शेतकऱ्यांना १५ बाय १५ चे शेततळे खोदण्यासाठी १८ हजार ६२१ रुपये अनुदान मिळते. तसेच अस्तरीकरणासाठी २८ हजार २७५ रुपयांचे अनुदान मिळते. २० बाय १५ चे शेततळे खोदण्यासाठी २६ हजार ६७४ रुपये आणि अस्तरीकरणासाठी ३१ हजार ५९८ रुपये अशा प्रकारे अनुदान मिळते.

वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्ज करताना २३ रुपये ६० पैसे एवढे शुल्क भरावे लागत आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांना अर्ज करता येतो. एकाच वेळी त्यांना जेवढ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी अर्ज करू शकतात.

जोपर्यंत लॉटरी पद्धतीने सदर योजनेसाठी निवड होत नाही, तोपर्यंत एकदा केलेला अर्ज ग्राह्य धरला जातो. म्हणजेच शेतकऱ्याला प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही आणि वारंवार अर्ज करावा लागत नाही.

आवश्यक कागदपत्रेवैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करताना सातबारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र अशी कागदपत्रे घ्यावी लागत आहेत.

कागदपत्रे वेळेत हवीतदरमहा प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होत असते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना एका ठराविक मुदतीत कागदपत्रे त्या साईटवर अपलोड करावी लागतात. जर दिलेल्या मुदतीत कागदपत्र अपलोड केले नाहीत तर प्रतीक्षा यादीमधील लाभार्थीना लाभ दिला जातो.

१५ x १५ शेततळे खोदण्यासाठी १८,६२१/- अनुदान२० x १५ शेततळे खोदण्यासाठी २६,६७४/- अनुदान

अधिक माहितीसाठी आपले कृषी विभाग, कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

अधिक वाचा: Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारकेंद्र सरकारसरकारी योजनापाणी