राजरत्न सिरसाट
हवामानाकूल बियाणे संशोधनासह कधी कोणते पीक घ्यावे, याकरिता देशातील २६ राज्यांत परंपरागत योजना राबिवण्यात येत असून, शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजनाची माहिती दिली जाणार आहे. यासाठीचे नियोजन केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयाअंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदेने केले आहे.
बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान जगासमोर उभे ठाकले असून अलीकडच्या काही वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी असे प्रकार वाढले आहेत याचे परिणाम पीक पद्धती, उत्पादनावर होत आहे. या पृष्ठभूमीवर हवामान अनुकूल शेती करण्यावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने नवे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करण्यावर परिषदेने भर दिला आहे. याकरिता देशातील कृषी विद्यापीठांना रूपरेषा ठरवून दिली आहे.
नऊ कोटी शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ माहिती
प्रत्येक गावाला आपत्कालीन पिकांची माहिती दिली जाणार आहे. अतिवृष्टी, कमी पाऊस या परिस्थितीत कोणते पीक घ्यावे याची माहिती सुरुवातीला देशातील ९ कोटी शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे देण्यात येणार आहे.
२८ टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करणार
रासायनिक खतांचा वापर प्रचंड वाढला असून, रासायनिकमुक्त शेती करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा वापर २८ टक्के कपात करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयाने घेतला आहे. जैवखते, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांवर लक्ष
अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस उत्पादन घेता यावे, यासाठीचे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असून, लवकरच हे तंत्रज्ञान देशातील २६ राज्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.
प्रत्येक गावाच्या शेतीचा अभ्यास
देशातील प्रत्येक गावातील शेतीचा अभ्यास व संशोधन करण्यात येत असून, मातीची उपयोगिता बघून कोणते पीक उपयुक्त आहे याचा अभ्यास सुरु आहे. सेंद्रिय प्रकल्प देशातील २६ राज्यांत राबिवण्यात येणार आहे सूक्ष्म सिंचनावर भर दिला असून, गॅस उत्सर्जन कमी करण्यावर भारताने जगाला आश्वासन दिल्याने ते कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.
जागतिक व भारतीय शेती याचा अभ्यास व संशोधन करून नवे नियोजन करण्यात आले असून, हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. - डॉ. सुरेशकुमार चौधरी, उपमहासंचालक, नैसर्गिक संसाधन, व्यवस्थापन भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली.